क्रीडारंग : एकलव्य खारीवित्सो केनसे

-अमित डोंगरे

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याच्या गोलंदाजीचे केवळ निरीक्षण करून ते देखील व्हिडिओज्‌च्या माध्यमातून एक युवा गोलंदाज नावारूपाला येत आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतही आपली निरीक्षणशक्‍ती जागृत ठेवत खारीवित्सो केनसे या मुलाने आपण जागतिक क्रिकेटमधील एकलव्य असल्याचे सिद्ध केले आहे. अर्थात, वॉर्न त्याचा फिरकी गोलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्‍त असलेला अंगठा कापून मागणार नाही, हा विश्‍वास आहेच.

वॉर्नच्या गोलंदाजीचे व्हिडिओ पाहून व त्यानुसार अभ्यास व सराव करत फिरकी गोलंदाजीचे धडे गिरवणारा नागालॅंडचा 16 वर्षीय लेगस्पिनर खरीवित्सो केनसे याचे नाव देशभरात गाजणार आहे. यंदाच्या आयपीएल लिलावासाठी केनसे उपलब्ध होणार आहे. यंदाच्या लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी खरीवित्सोने अनेकांचे लक्ष वेधले आहे. नागालॅंडमधील दिमापूरजवळच्या सोविमा गावातील एका सुतारकाम करणाऱ्या कारागिराची एकूण सात मुले आहेत. खारिवित्सो केनसे हे त्याचे पाचवे अपत्य आहे.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ केनसे याला त्यांच्या संघात सहभागी करून घेण्यासाठी मोठी बोली लावण्याची शक्‍यता आहे. केनसेने क्रिकेटचे मुख्यत्वे गोलंदाजीचे धडे गिरवायला सुरुवात केली तेव्हा तो ऑफस्पिन गोलंदाजी करण्याचा सराव करत होता. मात्र, त्यात चेंडू ग्रीप करताना त्याची बोटे दुखू लागल्याने त्याने लेग स्पिन गोलंदाजी शिकण्याचा सराव सुरू केला व त्यातच वॉर्नचे व्हिडिओ पाहून त्याने खूप काही आत्मसात केले. इतके की त्याची नागालॅंडच्या प्रमुख संघात वर्णी लागली. त्यानंतरही त्याला मोठ्या स्तरावरचे क्रिकेट खेळता येत नव्हते.

अखेर त्याला संधीही मिळाली आणि त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत नागालॅंडकडून अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सय्यद मुश्‍ताक अली करंडक स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने चार सामन्यांमध्ये 7 बळी घेत आपल्याकडे समीक्षकांचे लक्ष वेधले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघांनी ट्रायलसाठी बोलावले होते.

जर लिलावात त्याच्यावर बोली लागली नाही तरीही नंतरच्या निवड फेरीतही त्याला कोणत्याही संघात निवडले जाऊ शकते. अर्थात, त्यासाठी त्याची 20 लाख रुपये इतकी बेसप्राइज द्यायला कोणता संघ तयार होईल हे देखील महत्त्वाचे ठरेल. असो.

एखाद्या महान खेळाडूची कामगिरी व्हिडिओवर पाहून त्यातून अनेक गोष्टी शिकून मेहनत घेत व कसून सराव करत केनसे हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवत आहे. त्याची जर आयपीएलसाठी व त्यानंतर देशातील मानाच्या समजल्या जात असलेल्या रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली तर हा एकलव्य जागतिक क्रिकेटमध्ये अर्जुन बनायला वेळ लागणार नाही, पण त्यासाठी आवश्‍यकता आहे ती त्याला योग्य वेळी संधी देण्याची व त्याला उज्ज्वल भवितव्यासाठी पाठिंबा देण्याची.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.