- मोबाइलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहून कृत्य केल्याचा अंदाज
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – आठ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी थेरगाव येथे घडली.
कमल खेम साऊद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणी खेळत होते. त्यावेळी कमलची आई कामात व्यस्त होती. तर, वडील बाहेर गेले होते. दरम्यान, खेळत असताना कमलने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमलने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला.
काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.