सातारा – जिल्ह्यात एकीकडे करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना, दुसऱ्या बाजूला करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात आठ कोविडबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना देऊर, ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, तांदुळवाडी, ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष, कोरेगावातील 76 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना तरडगाव, ता. फलटण येथील 70 वर्षीय महिला, वेळेकामथी, ता. सातारा येथील 87 वर्षीय पुरुष, कार्वे, ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, कोरेगावातील 63 वर्षीय पुरुष, व्याजवडी, ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, अशा एकूण आठ कोविडबाधितांचा मृत्यू झाला. करोनाने जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 466 बळी घेतले आहेत.
575 नागरिक करोनामुक्त
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेत असलेल्या 575 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. आणखी 331 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 41, कराड उपजिल्हा रुग्णालयातील दहा, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 15, कोरेगावातील 51, वाईतील 31, खंडाळ्यातील 18, रायगावातील 17, पानमळेवाडीतील 21, महाबळेश्वरमधील पाच, पाटणमधील नऊ, खावलीतील 27, पिंपोडे येथील 27, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 59, असे एकूण 331 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.