श्रीगोंदा – केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये चार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चिखली येथील शुभाली परदेशी हिने 476वी रॅंक मिळवून मोठे यश संपादन केले होते. प्रशांत दरेकर, प्रियंका शिंदे व किरण वागस्कर यांनी एमपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश मिळविले आहे.
तालुक्यातील मढेवडगाव येथील सुजय शिंदे याने एमपीएससी परीक्षेत सहायक आयुक्त राज्यकर वर्ग 1 अधिकारी म्हणून यश संपादन केले आहे. सुजयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मढेवडगावमध्ये झाले, तर उच्च माध्यमिक व सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये घेतली. हिरडगाव येथील प्रशांत दरेकर याने एमपीएससी परीक्षेत सहायक आयुक्त राज्यकर विभाग वर्ग 1 अधिकारी म्हणून बाजी मारली.
प्रशांतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नगर येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवी संपादन केली. श्रीगोंदा नगरपालिकेत करनिर्धारण अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दुसऱ्यांदा एमपीएससी परीक्षेत कामठीचा झेंडा रोवला आहे. शिंदे यांची नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून निवड झाली आहे.
राजापूर येथील शेतकरी कुटुंबातील कन्या श्रुतिजा वीर हिने कृषी अधिकारी म्हणून यश संपादन केले आहे. सुरोडी येथील किरण वागस्कर याने दुसऱ्यांदा एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. किरण हा श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक भास्करराव वागस्कर यांचा मुलगा आहे. एरंडोली येथील धनेश बनकर याने दुसऱ्या प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून यश संपादन केले.
घोटवी येथील कृषिकन्या सिमाली निंभोरे हिने एमपीएससी परीक्षेत सहायक रचनाकार अधिकारी म्हणून यशाचा झेंडा रोवला आहे. अजनूज येथील सुलभा गायकवाड हिने एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून सहायक अभियंता जलसंपदा विभागात स्थान पटकाविले आहे.