सांगली (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी करोनाचे आठ नवे रुग्ण आढळले असून त्यामध्ये वशी येथील तीन, शिराळे खुर्द, तिसंगी, पुजारवाडीतील प्रत्येकी एक व डिग्रजमधील दोघांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 11 व्यक्ती करोनामुक्त झाल्या.
जिल्ह्यात आजअखेर करोना रुग्णांची एकूण संख्या 294 झाली आहे. मिरज येथील करोना रुग्णालयात 102 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 183 व्यक्ती करोनामुक्त झाल्या असून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या नऊ आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
आज सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये वशी, ता. वाळवा येथील तीन जण, शिराळे खुर्द, ता. शिराळा येथील 53 वर्षांच्या पुरुष, तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथील 27 वर्षांचा पुरुष, डिग्रज ता. मिरज येथील दोन जण व पुजारवाडी, ता. आटपाडी येथील 53 वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे.