करोना आपत्ती : ईदगाह मैदान ट्रस्टचा निर्णय
पुणे – रमजान ईदच्या दिवशी पुण्यातील ईदगाह मैदान येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र येतात. अनेक वर्षांची परंपरा असलेला हा धार्मिक कार्यक्रम यंदा मात्र करोनामुळे होणार नाही. गेल्या दोन शतकांत प्रथमच ईदगाह मैदान हे ईदच्या दिवशी नमाज पठणासाठी बंद राहणार आहे, असे ईदगाह मैदान ट्रस्टने जाहीर केले आहे.
अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी सकाळी सामूदायिक नमाज पठणाद्वारे प्रार्थना करण्यात येते. पुण्यातील लष्कर परिसरातील ईदगाह मैदान येथे या दिवशी हजारोंच्या संख्येने बांधव एकत्र येऊन नमाज पठण करतात. तसेच त्यानंतर गळाभेट घेत, शुभेच्छा देतात. गेले 200 वर्षांपासून याठिकाणी नमाज पठणाचा कार्यक्रम होत आहे. मात्र, यंदा करोनाचे संकट या नमाज पठणाच्या परंपरेवरही आले असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगून हा कार्यक्रम रद्द केला जाणार आहे.
याबाबत ट्रस्टचे विश्वस्त जैनउद्दीन काझी म्हणाले, “ईदगाह मैदान येथे सामूदायिक नमाज पठणाला मोठी परंपरा आहे. गेल्या दोन शतकांपासून येथे सामूदायिक नमाज पठण केले जाते. आतापर्यंत कितीही संकटे आली, तरी या मैदानाचे दरवाजे नमाज पठणासाठी कधी बंद झालेले नव्हते. उलट संकटकाळात याठिकाणी अधिक संख्येने लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात. मात्र, आज करोनासारखे संकट उभे आहे. त्यामुळे येथील दरवाजे नागरिकांसाठी बंद असतील.’
ट्रस्टतर्फे “सोशल डिस्टसिंग’च्या नियमांचे पालन करत, नमाज पठणाचा कार्यक्रम करता येईल, का याबाबत विचार करण्यात आला. मात्र, याठिकाणी येणाऱ्या बांधवांची संख्या लक्षात घेता, हे अडचणीचे ठरू शकेल. यामुळे करोना फैलावाचे प्रमाण अधिक वाढण्याची भीती लक्षात घेत, ट्रस्टने सामूदायिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेतला आहे.