3.3 लाख कोटींचा खर्च करून वसवली जातेय इजिप्तची नवी राजधानी

कैरो, दि. 17- इजिप्तची सध्याची राजधानी कैरो हे शहर सर्व सोयी सुविधा देण्यास अपुरे वाटू लागल्याने इजिप्तच्या प्रशासनाने आता नवी राजधानी बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल 3.3 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. इजिप्तची सध्याची राजधानी कैरो ही साधारण तीन हजार 85 चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये फैलावली आहे.

2013 मध्ये या शहराची लोकसंख्या 1 कोटी 80 लाख होती. ती आता दोन कोटींच्या वर गेली आहे 2050 पर्यंत या शहराची लोकसंख्या चार कोटी होण्याची शक्‍यता असल्याने. नव्या राजधानीचा विषय समोर आला आहे. येत्या काही वर्षांमध्ये कैरो शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने नवी राजधानी विकसित करण्यात येणार आहे.

कैरोपासून दूर 45 किलोमीटर अंतरावर सातशे चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये ही प्रशासकीय राजधानी बसवण्यात येणार आहे. या राजधानीच्या शहरांमध्ये 65 लाख लोकांची सोय करण्यात येणार आहे. हे नवे शहर संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असेल. या शहरामध्ये न्यूयॉर्क लंडनसारख्या सर्वात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

या शहराच्या बाहेर 90 चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या शहराची विजेची गरज या प्रकल्पाद्वारे भागविण्यात येणार आहे. शहराच्या चारही बाजूला कृत्रिम सरोवरे बसवण्यात येणार आहेत. विजेवर चालणारी रेल्वे आणि एक नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुद्धा या शहराचे वैशिष्ट्य असणार आहे.

या शहरांमध्ये लहान-मोठी अशी 400 पेक्षा जास्त रुग्णालये असणार असून शाळा आणि महाविद्यालयांची संख्याही तेवढीच असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी या शहरांमध्ये विविध हॉटेल तयार करण्यात येणार असून या हॉटेल्समध्ये 30 हजार पेक्षा जास्त रूमची उपलब्धता असणार आहे.

या शहरांमध्ये जगातील सर्वात उंच असा एक टॉवरही उभारण्यात येणार आहे.14 हजार एकर क्षेत्रामध्ये एक मोठा शॉपिंग मॉल, मशीद आणि भव्य असे चर्चही उभारण्यात येणार आहे. 2015 मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून 2030 पर्यंत या नव्या राजधानीच्या शहराचा हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.