पुणे – चिकनमध्ये करोना विषाणू असल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल केल्याने चालू पंधरवड्यात सुमारे 40 टक्क्यांनी ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाली आहे. करोना विषाणूचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात करोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत, असे केंद्रीय पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सांगली आणि औरंगाबाद या प्रमुख ब्रॉयलर्स उत्पादक विभागांत उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या निम्मा दरही मिळत नसल्याचे चित्र आहे. पुणे विभागात 73 रुपये प्रतिकिलो लिफ्टिंग रेट ब्रॉयलर कोंबड्यांना मिळत होता. त्या तुलनेत सोमवारी 55 ते 45 रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव घटल्याची पोल्ट्रीचालकांची तक्रार आहे.
देशभरात ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाल्यानंतर पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात केंद्रीय पशुपालन विभागाकडे स्पष्टीकरण मागीतले होते.