दोहा (कतार) – कतारमध्ये फसवून ड्रग्ज आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मुंबईच्या दांपत्याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) प्रयत्न सुरु केले आहेत. हनीमून पॅकेजच्या बहाण्याने त्यांच्या बॅगमध्ये हशीश हा अमली पदार्थ ठेवण्यात आला होती.
एनसीबीला समजलेल्य माहितीनुसार हे दांपत्या मागील वर्षी कतारला हनीमूनसाठी गेले होते. परंतु त्यांच्या बॅगमध्ये फसवून ठेवण्यात आलेले चार किलो हशीश विमानतळावरील तपासणीत सापडले आणि त्यांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या दांपत्यामधील स्त्रीच्या काकीनेच त्यांच्या सामानात चार किलो हशीश ठेवण्याचे कारस्थान केले होते. आता भारतीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात असे आढळून आले आहे की, हे दांपत्य निर्दोष असून खरे दोषी ड्रग्ज तस्कर आहेत. त्यामुळे मोहम्मद शरीक आणि ओनिबा कौसर या दोघांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या सांगण्यानुसार 6 जुलै 2019 रोजी शरीक आणि त्याची पत्नी ओनिबा यांना कतारची राजधानी दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. त्याच्या सामानात सापडलेले 4.1 किलो हशीश जप्त करण्यात आले आणि त्यांच्यावर खटला चालवून त्यांन दहा वर्षांची शिक्षा व त्याचबरोबर मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
ओनिबाचे वडिल शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे 27 सप्टेंबर 2019 रोजी तक्रार केली होती. त्यामध्ये ओनिबाची काकी तबस्सुम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निजाम कारा याचा हात असल्याची माहिती दिली होती. त्यांनीच दोघांना हनीमून पॅकेज करून दिले होते. त्यांनीच दोघांच्या बॅगमध्ये हशीश लपवले होते. या सगळ्याला पुरावा म्हणून शकील अहमद कुरेशी यांनी काही कागदपत्रे आणि ऑडिओ क्लिप सादर केल्या आहेत.
एनसीबीच्या तपासात असे आढळून आले की, तबस्सुम आणि निजाम कारा हे दोघे मुंबईत अतिशय संघटितपणे ड्रग्ज सिंडिकेट चालवतात. याच तपासादरम्यान पोलिसांनी नागपाड्यातून निजाम कारा आणि तबस्सुमला 13 ग्रॅम कोकेनसह 22 डिसेंबर 2019 रोजी अटक केली.
पाठोपाठ एनसीबीने त्यांच्या टोळीतील वेदराम, महेश्वर, शहनवाज गुलाम आणि शब्बाना यांना चंडीगढमध्ये दीड किलो चरससह पकडले. हे चरस तबस्सुम आणि निजाम यांनीच पाठवले असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर एनसीबीने या दोघांची चौकशी केली असता शरीक आणि ओनिबा यांच्या सामानात आपणच हशीश ठेवल्याचे मान्य केले. आता एनसीबी राजनैतिक पातळीवर केंद्र शासनाच्या सहकार्याने कतारमधून दोघांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.