केंद्रीय मंत्री हर्षवर्धन : “सिरम’द्वारा डेंग्यूवर औषध विकसित, लस उत्पादन केंद्राचेही उद्घाटन
पुणे – केंद्र सरकार कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पूरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे सरकारचे धोरण यशस्वी होण्यासाठी आगामी काळातही अनेक योजना राबविल्या जाणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
“सिरम’ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील लस उत्पादन केंद्राचे उद्घाटन करताना हर्षवर्धन बोलत होते. ते म्हणाले, “सिरम’ लसीकरण मोहीम राबवण्यामध्ये सहायक राहिली आहे. लसीकरण उपक्रम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो आणि मुले व गरोदर मातांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक लसीकरण करून घेण्यास प्रोत्साहित करतो. या क्षेत्रातून लस नसलेल्या आजारावर लस निर्माण होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
हा जगातील सर्वांत मोठा लस उत्पादन प्रकल्प आहे. येथे वर्षाला 500 कोटी डोसचे उत्पादन केले जाऊ शकणार आहे. पुढील 5 वर्षांत या प्रकल्पात 3 हजार रोजगार निर्माण होणार आहेत, असे यावेळी इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितले. या प्रकल्पात आतापर्यंत 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दरम्यान, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी सेरमने 24 ते 48 तासांत उपचार करणारे औषध विकसित केल्याचे सांगितले. डेंग्यूवर मोनोक्लोनल ऍन्टिबॉडिटो उपचार पद्धती विकसित केली आहे. यावरील चाचण्या पूर्णत्वास आल्या आहेत. नंतर सरकारकडे परवानगी मागण्यात येईल. लसीपेक्षा हे औषध लवकर परिणाम करणारे असल्याचे ते म्हणाले.