राज्यात वनशेतीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न

मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी : पर्यावरण संवर्धनही होणार

पुणे – “नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी या संसाधानांची उपयुक्तता लक्षत घेणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे संसाधनांच्या जतनामागील आर्थिक लाभाबाबत जनजागृती झाल्यास वनसंसाधनांचे संवर्धन होण्यास मोठी मदत मिळेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वनशेती हा सर्वोत्तम पर्याय असून, राज्यात आगामी काळात वनशेतीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होणार आहेत,’ अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमुख वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी दिली.

वाढती लोकसंख्या, हवामान बदलाचे दुषरिणाम यामुळे नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर द्यायला हवा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे असताना आपल्या राज्यात केवळ 15 ते 20 टक्के क्षेत्रच वनाने व्यापलेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी सध्या वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी त्यात काही उणिवा राहत आहे. अशावेळी वनशेतीतून वृक्ष लागवड वाढविणे हा एक चांगला पर्याय प्रशासनासमोर आला आहे. वनवृक्षांपासून शेतकऱ्यांना चारा, फळे, वनौषधी, लाकूड मिळते. वनवृक्ष जमिनीची होणारी धूप थांबवून पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरणाचे काम करतात. वनशेतीतून पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो. वनशेतीचे हे फायदे लक्षात घेत, सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.