पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न हवेत

– सुरेश भुजबळ

बेल्हे – सगळीकडे जागतिक पर्यावरण दिन देशात साजरा होत आहे. पर्यावरणाचे महत्त्व केवळ कागदोपत्री रंगविण्यापेक्षा प्रशासनाने पर्यावरणाविषयी सर्व सामान्य माणसांपर्यत जागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पाच जून भारतात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा दिवस साजरा होताना पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचले नसल्यामुळे वृक्षारोपण करण्याऐवजी वृक्षतोड होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. सध्या दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण अतीशय कमी होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पूर्वी सर्वत्र जंगले मोठ्या प्रमाणावर होती. आज या जंगलात झाडेतोड मोठ्या प्रमाणात होत आहे, याकडे कुणालाच लक्ष देण्यास वेळ नाही. ग्रामपंचायत, महसूल व वन विभागाच्या वतीने देशात सर्वत्र लाखो झाडांची लागवड केल्याची नोंद केली जाते. सर्वत्र

वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होत असले तरी, त्या लावलेल्या रोपांचे संगोपन किती होते, असे कोणत्याही विभागाला विचारले, तर हा सध्या कळीचा मुद्दा ठरेल. बेसुमार वृक्षतोडीमुळे सर्वत्र झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. देशात बेसुमार वृक्षांची कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पूर्वी पावसाळ्यात पाऊस पडायचा, हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात कडक ऊन असे निसर्ग चित्र असायचे. आता ऋतूत पूर्णतः बदल झाला आहे.

संवर्धन करणाऱ्यास प्रोत्साहन द्या
जेथे वनविभागाची जंगले आहेत, त्या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन झाडे लावली जातात, त्याचे संगोपन होते की नाही, याची खातरजमा करून घेतली पाहिजे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक कुटुंबाला एक झाड लावण्यासाठी आग्रह धरुन त्या कुटुंबाने झाड लागवड केली आहे की नाही, त्या झाडाचे संगोपन केले आहे की नाही, हे पाहताना झाडाचे संगोपन करणाऱ्या कुटुंबाचा सन्मान केला पाहिजे. ज्यांनी झाडे लावल्यानंतर झाडे वाचवली नसतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच ही झाडे टिकतील.

पर्यावरण दिन एक दिवसापुरता नको
देशातील प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. मानवाला आरोग्य धन संपदा ठेवण्यासाठी जागतीक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवसाचा साजरा न करता, वृक्षारोपणा बरोबर संगोपन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. याचा फायदा माणसाला होणार आहे. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा संदेश महत्वाचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.