वॉशिंग्टन – भारताच्या मदतीने अमेरिका कोविड-19 वरील औषध तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या संशोधनामध्ये सहभागी होत असलेले भारतीय-अमेरिकेचे शास्त्रज्ञ खूपच महान आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोविड-19 वरील औषध निश्चितपणे तयार होईल, अशी आपल्याला आशा वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
करोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी जगभरातील संशोधकांच्या या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ग्लॅक्सो स्मिथ क्लिनच्या माजी औषध प्रमुखांची म्हणून नेमणूक करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. भारतीय संशोधकांबरोबर सहकार्याने सुरू असलेले औषध निर्मितीचे प्रयत्न समाधानकारकपणे सुरू आहेत. अमेरिकेत अनेक भारतीय आहेत आणि औषध निर्मितीसाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत, असे सांगून ट्रम्प यांनी प्रथमच भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन गुणवत्तेची दखल घेतली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र आहेत, असे सांगून ट्रम्प यांनी भारतासाठी व्हेंटिलेटर देण्याची घोषणा ट्विटरवर केली. भारताबरोबर मिळून अमेरिका करोना विषाणूविरोधात लस तयार करत आहे. या अदृश्य शत्रूला पराभूत करण्यास आम्हाला नक्की यश येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.