प्रभावी भाषण कला साधना आणि अविष्कार

जीवनात अनुभव हाच गुरू आहे. मोठे होण्यासाठी गुरूचे, मोठ्या लोकांच्या अनुभवाचे अनुकरण केल्यास कमी कालावधीत यशोशिखराकडे वाटचाल करतो. अनुभवी वक्‍त्याच्या अनुकरणाने अनुभवाची शिदोरी परिपक्व होते. म्हणून तर म्हटले जाते “वाचाल तर वाचाल.’

वक्तृत्वाची मोठी परंपरा आपल्या देशात पूर्वापार आहे. अगदी वेदांत, उपनिषदांत वक्तृत्व कलेचा उल्लेख आहे. भारतीय संस्कृतीमध्ये “भाषण कला’ एक पिढी दुसऱ्या पिढीला संक्रमित करताना आढळते. तसे हावभाव व नेत्रसंकेताचे नसते. मौखिकता व कृतिशीलता या दोन्ही गोष्टी वक्तृत्वाला खतपाणी घालतात. वाग्विद हा वक्तृत्व कलेशी संबंधित शब्द रामायण काळापासून प्रचलित आहे. शाब्दिक दान करणाऱ्यांना वाग्विद असे म्हणतात. कैकेयीने स्वत:च्या वचनपूर्तीसाठी दशरथाशी केलेला युक्तिवाद व श्रीरामाने पिता राजा दशरथाशी केलेला युक्तिवाद, श्रीरामाला वनवासात पाठवण्यास यशस्वी झाला.

सीतेने लग्न झाल्यानंतर स्त्री पतीची अर्धांगिनी असते, मनात, जनात आणि वनातही मी आपल्याबरोबर येणार, असे ठामपणे सांगितले. स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित राखणारी तीच पहिली मुक्तीवादी स्त्री. सीता हाही वाक्‌चातुर्याचा उत्तम दाखला आहे. हनुमानाची रामावरील भक्ती, श्रद्धा व्यक्त करण्याचे भावानुमानाच्या वाक्‍चातुर्याचा सुंदर नमुना आहे. सुसंवाद साधून धर्माचा प्रचार व प्रसार करणारे भगवान गौतम बुद्ध, अहिंसेचा प्रचार करणारे भगवान महावीर, तसेच सारथी रूपात कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश ही आजही गीतेच्या माध्यमातून जीवनतत्त्व सांगणारी वक्तृत्वकलेची सुंदर उदाहरणे आहेत.

राजा अकबर व चतुर बिरबल यांच्यातील वाक्‌चातुर्यामध्ये नेहमी बिरबल सरस ठरला. तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत रोहिदास, संत रामदास, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत आनंदऋषीजी यांनी अंधश्रद्धा, कर्मकांडाला विरोध करण्यासाठी कीर्तन, प्रवचन, व्याख्याने देऊन जनजागृती केली. हेही मौखिक परंपरेपासून आलेले कृतिशील विचारवंतांचे विचार वक्तृत्व कलेला पोषक आहेत.

संतांची आध्यात्मिकता, राजकीय लोकांची राजकीयता सिद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने मावळ्यांवर छाप पाडून स्वराज्य स्थापनेच्या ध्येय सिद्धीसाठी प्रेरित केले. म्हणजेच कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, या बरोबरच वासुदेव, गोंधळी, तमासगीर या साऱ्यांच्या वक्तृत्व कलेतील कला मौखिक परंपरेने वृद्धिंगत केल्या.

– प्रा.सुरेखा कटारिया
– डॉ. श्‍वेता राठोड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here