– श्वेता अक्षय ढोरे
जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता तेव्हा तुमचा resume हा तुमच्या आधी एम्प्लॉयरकडे पोहोचलेला असतो. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे कि “फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन” त्यानुसार आपला resume चे फर्स्ट इम्प्रेशन हे चांगलेच पडले पाहिजे आणि पुढील फेरीसाठी आपली निवड झाली पाहिजे. यासाठी तुमचा resume आकर्षक आणि strong असणे फार महत्वाचे आहे. resume बनविणे हे काम नवीन उमेदवारांसाठी जरा आव्हानात्मकच असते. तुमच्या resume ची नोंद एम्प्लॉयरने घ्यावी यासाठी तुमची पहिली पायरी हि strong resume बनविणे हि असेल. आता आपण पाहूया strong resume बनविण्यासाठी कोणत्या गोष्टी त्यात लिहिणे गरजेचे आहे.
१. महत्वाच्या माहितीला प्राधान्य द्या
तुमचा resume जेव्हा वाचला जातो तेव्हा तुमच्याकडे एम्प्लॉयरचे लक्ष वेधून घेण्याकरिता अगदी काही सेकंदच असतात. त्यामुळे तुम्ही तुमची महत्वाची माहिती हि सर्वात वर लिहा जेणेकरून ती सहज वाचून त्याची नोंद घेतली जाईल.
२. कामातील अनुभव
भरती प्रक्रियेमध्ये अनुभव असणे म्हणजे दुग्धशर्करा योग असणे होय. रिक्रूटरला प्रभावित करण्यासाठी कामातील अनुभव असणे म्हणजे सहजरीत्या पुढील पायरीवर जाण्याची गुरुकिल्लीच होय. जर तुम्हाला अनुभव असेल तर तो तुमच्या resume वर अगदी ठळक अक्षरात लिहा जेणेकरून तो हायलाईट होईल. आणि जर तुम्हाला अनुभव नसेल तर चांगली नोकरी मिळविण्यासाठी अनुभव जमवा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.
३. पारदर्शक आणि सोपा resume
पारदर्शक आणि संक्षिप्त(concise) स्वरुपात असलेला resume हा खूप मोठ्या किंवा अनावश्यक माहिती असलेल्या resume पेक्षा जास्त आकर्षक ठरतो. तुमच्या resume मध्ये ठराविक शब्द लिहिणे ठीक असते पण विनाकारण तो दीड ते दोन पानांपर्यंत ताणणे हे चुकीचे आहे. याचा resume च्या प्रभावावर वाईट परिणाम होतो. पारदर्शक आणि सहज सोपा resume हा केव्हाही आकर्षक असतो आणि त्याची तुम्हाला निवड होण्यासाठी मदत होते.
४. नोकरीनुसार resume कस्टमाईझ करणे
जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट नोकरीसाठी अर्ज भरणार असता तेव्हा तुम्ही सर्वात आधी त्या कामाबद्दल विचार करून त्याच्याशी संबंधित माहिती हि resume वर सर्वात वर लिहिली पाहिजे ज्यामुळे ती सहज दिसेल व त्याची नोंद घेतली जाईल. उदा.जर तुम्ही शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज भरत असाल तर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे यातून तुम्ही विद्यार्थ्यांना किती प्राधान्य देता व त्यांना हाताळण्याची तुमची क्षमता दिसून येते.
५. कौशल्यांची यादी न करता तुम्ही कशामध्ये यश संपादन केले आहे त्याची यादी करा
तुमच्याकडे विविध प्रकारचे कौशल्य असणे खरच उत्तम आहे पण त्या कौशल्यांचा वापर करून तुम्ही काय साध्य केले हे महत्वाचे आहे. त्यामुळे कौशल्यांची यादी न करता त्यापेक्षा असे कार्यक्षम(active) शब्द वापरा जे तुम्ही संपादन केलेल्या यशाचे वर्णन करतील. उदा. “आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित”.
६. विश्वासार्हता (Trustworthy) असु द्या
जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. तुमच्या resume मध्ये खोटी माहिती देऊ नका. काही उमेदवार त्यांची कौशल्ये आणि जुन्या कामांबद्दलची खरी माहिती देत नाहीत. पण कधीकधी तुम्हाला काम देण्याआधी तुमचे जुने रेकॉर्ड पहिले जातात आणि तेव्हा तुम्ही पकडले जाऊ शकता. तुमचा खोटेपणा जर पकडला गेला तर हे सिद्ध होते कि तुम्ही योग्य उमेदवार नाही आहात. त्यामुळे खरे राहण्याचा प्रयत्न करा.
७. पडताळून पहा (Proofread)
तुमचा resume फायनलाईज करण्याआधी तो काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. खासकरून जर तुम्ही दुसर्यांचा resume कॉपी करून पेस्ट करत असाल तर नक्कीच तो पडताळून पहा.
उत्तम resume बनवणे म्हणजे तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळवण्याकरीता चढलेली पहिली पायरी होय. resume बनवताना त्यात तुम्ही मिळवलेले यश दिसून येणे व या कामासाठी तुम्ही योग्य उमेदवार कसे आहात हे सिद्ध करणे गरजेचे आहे. मला आशा आहे तुम्हाला नक्कीच याचा strong resume बनविण्यास फायदा होईल.