अँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी

 करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, आता करोनाबाधित रुग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. नुकत्याच पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांना अँटीबॉडी कॉकटेल उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे. मोनोक्‍लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

या औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे जे कोरोना विषाणूंविरुद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्‍कल करतात. हे औषध मोनोक्‍लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. हे विविध आजारांविरुद्ध अत्यंत प्रभावी आहेत.
या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते.

यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती. या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्‍शन्स सोडण्यात आली, ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध करतात त्यामुळे कोरोना विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही व कोरोना रोखण्यास मदत मिळते.

24 तासाच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. या उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरिरातून कोरोनाची लक्षणे गायब झाली, शिवाय त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणाम ही झाले नाहीत. त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले. अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होतात अशी माहिती रुग्णालयाच्या श्‍वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल (नि. ब्रिगेडिअर) यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.