पुणे : भारत आणि जपान या दोन देशांमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आदान-प्रदान करण्यासाठी नुकताच करार करण्यात आला. कराराद्वारे विद्यार्थ्यांना जपानमधील करिअरच्या संधींसाठी तयार करण्यासाठी जपानी भाषा, सांस्कृतिक शिष्टाचार आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यभरातील सर्व सरकारी आणि अनुदानित संस्थांमधील विद्यार्थीही या उपक्रमांचा लाभ घेऊ शकतील.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि कॉग्नावी इंडिया ही जपानी संस्था करार करण्यात आला. यावेळी सरकारच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसचिव संतोष खोरगडे, तर कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक वरुण मोदील, संचालक मित्सु सेकिना, महाव्यवस्थापक नोरिको मियामोटो, उपमहाव्यवस्थापक मोहित सरीन आदी उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना जपानमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून, याचा खर्च सीओईपी, कॉग्नावी आणि विद्यार्थी हे संयुक्तपणे उचलतील. करारानुसार जागतिक व्यावसायिक विषयांवरील साप्ताहिक पॉडकास्ट व लेख प्रसिद्ध करण्यात येतील. एमबीए व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी भारत व जपानमधील जपानी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व अंतिम प्लेसमेंट संधी दिल्या जातील. ऑनलाइन परस्परसंवादाद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. त्याचप्रमाणे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सीओईपी टेक आणि जपानमधील वरिष्ठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून जोडले जाईल. भारतीय व जपानी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम विकसित करण्यात येतील.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कॉग्नावी यांच्यातील ही भागीदारी जागतिक स्तरावर सक्षम विद्यार्थी घडविण्याच्या “सीओईपी टेक’च्या वचनबद्धतेचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सहकार्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील. त्याचप्रमाणे सीओईपीच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची दारे उघडतील.
– डॉ. सुनील भिरूड, कुलगुरू, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ