शैक्षणिक कर्ज लागू करावे

पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्याचा प्रस्ताव

पुणे – विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित तत्वावरील चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार पेलवत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाकडून माफक व्याज दराने शैक्षणिक कर्ज लागू करावे, असा ठराव अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख यांनी मांडला आहे. त्यामुळे या विषयावर विद्यापीठ काय निर्णय होईल, याची उत्सुकता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) बैठक येत्या 14 तारखेला होत आहे. त्यात 36 ठराव आणि दोनच प्रश्‍न अधिसभा सदस्यांनी उपस्थित केले आहेत. त्यात प्रा. शामकांत देशमुख यांनी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी ठरावाद्वारे विद्यापीठाकडे केली आहे. विशेषत: महाविद्यालयात व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क काही विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नसते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण सोडून देतात. अशा स्थितीत विद्यापीठाकडून आर्थिक मदतीचा हातभार लागल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणे शक्‍य होईल. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची योजना विद्यापीठाने लागू करावी, याकडे प्रा. देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

प्रवेशाची अंतिम तारीख निश्‍चित करावी
विद्यापीठाच्या सर्वच विद्याशाखेची परीक्षा यावर्षीपासून सेमिस्टर पद्धती सुरू झालेल्या आहेत. त्याचा विचार करून प्रवेशाची अंतिम तारीख निश्‍चित करावी, असा ठराव प्राचार्य प्रकाश पाटील यांनी मांडला आहे. त्यामुळे प्रवेशामध्ये एकसूत्रता येण्याची चिन्हे आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.