पिंपरी – दोन महिन्याच्या सुट्टीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सुरु होणार असल्याने पालकांनी शनिवारी, रविवारी सुट्टीची संधी साधत बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सर्व प्रकारच्या साहित्यांच्या दरात सरासरी 20 टक्के वाढ झाल्याने यंदा पालकांच्या खिशाला झळ बसत आहे. गेल्यावर्षी देखील शैक्षणिक साहित्यांच्या दरात 20 ते 30 टक्के वाढ झाली होती. यंदा पुन्हा वाढ झाल्याने पालकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी या स्थानिक बाजारपेठेत शालेय साहित्याचे विक्रेते आहेत. बहुतेक शाळा सुरू होण्यास आठवडा राहिला आहे. तर काही शाळा सुरू देखील झाल्या आहेत. याने विशेषतःपिंपरी-चिंचवड बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी होत आहे.
यावर्षी नववी, दहावीची पुस्तके, वह्या, बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. करोनापूर्वी दर स्थिर होते. मात्र करोनानंतर कच्चा मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दराचा आर्थिक फटका विक्रेत्यांबरोबर पालकांना बसला आहे. गेल्यावर्षी देखील शैक्षणिक साहित्याच्या किंमतींमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदाही 15 ते 20 टक्क्यांची वाढ आहे.
नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच उपलब्ध आहे. नववीचा संच हा गतवर्षी 419 रुपयांना मिळायचा. यात 8 पुस्तके असतात. तो आता 523 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहावीच्या पुस्तकांचा संच हा 575 रुपयांवरुन 665 रुपये इतका झाला. त्यात 9 पुस्तके असतात.
चिमुकल्यांचाही खर्च अधिक
नर्सरी, प्लेग्रुपमध्ये जाणाऱ्या चिमकुल्यांच्या शैक्षणिक खर्च देखील यंदा वाढलेला दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांच्या स्कूल बॅग, वॉटर बॅग महागल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळांचे वेगवेगळे गणवेश आहेत. शाळांनी पालकांना गणवेश व इतर साहित्याची लिस्ट पाठवून दिली आहे. त्यामुळे खरेदीस सुरुवात झाली असून गणवेश देखील महाग झाल्याचे दिसून येत आहे.
वह्या महागल्या
100 पानांची वही 25 रुपये, 200 पानांच्या वहीची किंमत 35 रुपये आहे. यंदा 5 7 रुपये प्रति वहीमागे वाढले आहेत. 100 पानांची (लॉंग बुक) 40 रुपये तर 200 पानांची 80 रुपयांना मिळत आहे. प्रत्येक लॉंग बुकमागे 10 ते 15 रुपये यंदा वाढले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा दरात 20 ते 25 टक्के वाढ झालीआहे.
अशा आहेत किमती
कंपास पेटी 120 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत
जेवणाचा डबा (प्लास्टिक) 80 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत
पाण्याची बाटली 80 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत
दफ्तर 300 रुपयांपासून ते 500 रुपये.स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ट्रान्स्फर स्टेशन बांधणे