भेंडा (वार्ताहर) – शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानूसार आणि परिस्थितीनूसार आव्हाने पेलवत शिक्षण घेवून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात. करोनासारख्या संकटात ऑनलाइन शिक्षणावर भर देवून आपले शिक्षण चालू ठेवावे, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले.
भेंडा येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयामधील 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 96.35 टक्के, वाणिज्यशाखा 96.96 टक्के तर कला शाखेचा 77.46 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत गौरव नारायण म्हस्के( 80.92), वाणिज्य शाखेत गंगोत्री गणेश घोडके (82.62) तर कला शाखेत मेघा दिलीप काळे (76.31) यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
तसेच करोना परिस्थितीत झूम ऑनलाइन क्लासेस राबवत असल्याबद्दल प्रा. गवळी व प्रा. मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. माजी आ. पांडूरंग अभंग, संचालक काशिनाथ नवले, प्रा. नारायण म्हस्के, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव काकासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे, रामकिसन सासवडे, प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य प्रा. भारत वाबळे आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.