शिक्षण संस्थांची बनवेगिरी चव्हाट्यावर

– व्यंकटेश भोळा

पुणे – अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक एकाच वेतनात एका ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्षात दोन किंवा अधिक संस्थांमध्ये कागदोपत्री शिकवत असल्याचा प्रकार “एआयसीटीई’ने दिलेल्या आदेशावरून समोर आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एकावेळी प्राध्यापक दोन महाविद्यालयांमध्ये शिकवत असल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थेवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांचे धाबे धणाणले आहेत.

देशात अभियांत्रिकी- चार हजारांवर, तर पदविका अभियांत्रिकी- साडेतीन हजार महाविद्यालये आहेत. तसेच “एआयसीटीई’च्या अधिपत्याखाली व्यवस्थापनशास्त्रासह सुमारे 10 हजार महाविद्यालये आहेत. काही संस्थांची दोन ते चार महाविद्यालये असतात. तेथे एकच प्राध्यापक दोन किंवा अधिक महाविद्यालयांत कार्यरत असल्याचे दाखवविण्यात येते. प्रत्यक्षात एक प्राध्यापक एकावेळी एकाच ठिकाणी शिकवू शकतो. पण, ते दोन ठिकाणी शिकवत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संस्थाचालकांकडून आवश्‍यक प्राध्यापकांची भरती अपेक्षित असतानाही दोन महाविद्यालयांमध्ये एकच प्राध्यापक शिकवत असल्याचे दाखविण्याचे उद्योग सुरू आहेत. त्याची गंभीर दखल घेत “एआयसीटीई’ने आता एका विषयाचा अध्यापक एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका अध्यापकाची दोन संस्थांमध्ये पटलावर नोंद आढळल्यास कठोर कारवाईचे आदेशच देण्यात आले आहेत.

प्रवृत्ती ठेचणार
एकाच प्राध्यापकास आपल्याच संस्थेच्या दोन महाविद्यालयांत अध्यापन करण्यासाठी संस्थेकडून दबावतंत्र वापरले जाते. त्यामुळे काही प्राध्यापकांना दोन ठिकाणी अध्यापन करावे लागते. त्यासाठी खोट्या कागदपत्रांची नोंद दाखविण्याची शक्‍कल लढविली जाते. मात्र, त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती संपुष्टात येण्यासाठी “एआयसीटीई’ने हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

अशी होईल कारवाई
“एआयसीटीई’या आदेशानुसार अशा प्रकारे अध्यापकांची दोन महाविद्यालयांमध्ये पटलावर नोंद आढळल्यास संबंधित महाविद्यालयांची प्रवेशक्षमता पहिल्या टप्प्यात दहा टक्के कमी केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात 20 व 30 टक्के प्रवेशक्षमता कमी करण्यात येणार आहे. यानंतरही एखाद्या शिक्षण संस्थेने कागदोपत्री खोटे प्राध्यापक दाखविण्याचा उद्योग केल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

प्राध्यापकांची नोंदणी आधारशी जोडणार
“एआयसीटीई’ने आता प्राध्यापकांची नोंदणी आधारकार्डाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आधारकार्डाशी

प्राध्यापकाची संलग्नता
केल्यामुळे एका प्राध्यापकाची नोंद दुसऱ्या महाविद्यालयाच्या पटलावर दाखवता येणार नाही. यानंतरही बनवाबनवी होऊ नये, यासाठी दरवर्षी “एआयसीटीई’कडून एकूण महाविद्यालयांच्या 2 टक्के महाविद्यालयांची अचानक तपासणी केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.