पुणे – सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना दोन महिने वेतन सुरूच ठेवल्याच्या प्रकरणात महापालिकेकडून केलेल्या तपासणीत 9 कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणे काम केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेत तीन वर्षांपूर्वी समाविष्ट या विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.
त्यामुळे या विभागाचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी बुधवारी या विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या. तसेच, कामगारांच्या वेतना संबंधीत सर्व रेकॉर्ड संगणकीकरण करून तातडीने अपडेट करण्याचेही आदेश दिले.
शिक्षण विभागाचा महापालिकेत समावेश करण्यापूर्वी या विभागाचे कामकाज शिक्षण मंडळ पाहत होते. महापालिकेकडून त्यांना केवळ वेतनाचा निधी दिला जात होता. मात्र, आता हा विभाग महापालिकेच्या नियंत्रणात आहे. मात्र, त्यानंतरही या विभागातील अनागोंदी कारभार सुरूच आहे. त्याची दखल घेत जगताप यांनी रेकॉर्डबाबत असलेल्या समस्या तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
त्या प्रामुख्याने या विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मंडळात कामावर रुजू झालेल्या तसेच सेवा निवृत्तीच्या तारखांच्या नोंदीच नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या विभागातील रेकॉर्डचे संगणीकरण करण्यात आले असले तरी ते रेकॉर्ड अद्याप पालिकेच्या समान्य प्रशासन विभागाकडे हस्तांतरीत केले नसल्याने कामगारांच्या सेवा निवृत्तीच्या नोंदीच सापडत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक ती कागदपत्रे शोधून या नोंदी तसेच सेवक वर्गासंबंधी रेकॉर्ड अपडेट करण्याचे आदेश जगताप यांनी दिले.