शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

पुणे : शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कामाच्या ताण तणावातुन सुटका व्हावी, कोणतीही चूक नसलेल्या अधिकाऱ्यांचे अटक सत्र थांबवावे यासह अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने शुक्रवारी (दि.१) एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. यामुळे अधिकारीच रजेवर असल्याने शिक्षण विभागाचे कामकाजच ठप्प पडणार आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी बाबतचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक होत असल्याच्या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. खरोखर ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी संघटनेची मागणी आहे. चोर सोडून संन्याश्याला फाशी या म्हणी प्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आधिकाऱ्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांच्या कामात अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी शासनाकडून मिळावी, अशी मागणीही संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे. एसआयटीची चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर वेतन देयकावर प्रतिस्वाक्षरी करण्यात येणार नाही. अतिरिक्त व्हीडीओ कॉन्फरसींगच्या बैठका व सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यात यावा. या सर्व मागण्यांवर शासनाने लेखी आश्वासन द्यावे अन्यथा येत्या ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे, कार्याध्यक्ष रविंद्र वाणी, सरचिटणीस सरोज जगताप, कोषाध्यक्ष डॉ. ज्योती परिहार , कार्यालयीन सचिव समरजीत पाटील यांनी दिला आहे.





