दैनिक “प्रभात’ने बाब समोर आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागे
पुणे – उशीरा का होईना पण जाग आलेल्या महापालिका प्रशासनाकडून शिक्षण विभागाची माहिती अखेर पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विभागाची माहितीच पालिकेच्या संकेतस्थळावर नसल्याने पालिकेच्या ई-गव्हर्ननन्सचा अजब कारभार दैनिक “प्रभात’ने समोर आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून त्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे 287 शाळा असून लाखभर विद्यार्थी आहेत. तसेच, दरवर्षी 400 कोटी रुपयांचा खर्च या विभागावर केला जातो. त्यामुळे साधे संकेतस्थळ अथवा या विभागाची माहितीही संकेस्थळावर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेची शिक्षण मंडळे बरखास्त झाल्यानंतर मंडळाचा कारभार महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली देण्यात आला आहे. त्यानंतर आयुक्तांनी या विभागाचे नाव बदलून “शिक्षण विभाग’ केले. तसेच, त्याचे काम आता पालिकेच्या अखत्यारित चालते. मात्र, याला वर्ष होत आले तरी, या विभागाची दहा ओळींचीही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नाही. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत पालिकेने सर्व विभागांची माहिती दरवर्षी संकेतस्थळावर “अपडेट’ करणे आवश्यक असताना या विभागाची साधी नोंदही पालिकेच्या संकेतस्थळावर नाही. त्यामुळे माहिती अधिकार अधिनियमालाही पालिकेकडून हरताळ फसला जात असल्याचे समोर आले आहे.
हे हि वाचा
पुणे – शाळा ई-लर्निंग, पण, वेबसाइटच नाही
दरम्यान, याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, चक्क “ही बाब लक्षातच आली नाही,’ असे सांगण्यात आले. ही बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी तातडीने शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागास सूचना दिल्या असून आवश्यक असलेली सर्व माहिती तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत संकेतस्थळावर जाहीर करण्याची माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.