टॅब खरेदी, शाळांच्या रंगरंगोटीचा अट्टहास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या नावाखाली ठेकदारांना कसा फायदा होईल याचाच विचार करुन अनेक “मलाईदार’ निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाला शिक्षण समितीच्या सदस्यांनीही बिनबोभाटपणे मान्यता दिली. दरम्यान याच बैठकीत आंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, काल घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पालकांमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नव्याने अस्तित्वात आलेल्या शिक्षण समिती ठेकेदारांना पोसण्याच्या धोरणामुळे सुरवातीपासूनच चर्चेत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकता नसताना थेट पद्धतीने वह्यांची खरेदी असो किंवा इतर निर्णयामुळे समिती नेहमीच भ्रष्टाचार आणि ठकेदाराच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. आता शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीच्या नावाखाली शिक्षण समितीने एक अजब उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आणला आहे.
मनपाच्या 12 उपक्रमशील शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करून देण्यासाठी समिती सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली. महापालिकेने असे उपक्रम हाती घेतले होते. यामध्ये संस्थेचे पथक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत होते. शिवाय, मध्यंतरी बजाज कंपनीने मनपाच्या 50 शाळा संगणकीकृत ज्ञान वाढीसाठी चालविण्यास घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या नावाखाली असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. संबंधित संस्थांवर कोट्यवधींची उधळपट्टी झाली.
विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्याऐवजी ठेकेदार, शिक्षण मंडळ सदस्यांचे भले झाले.लाखो रुपयाच्या टॅबच्या खरेदीला मान्यता दिल्यामुळे यातून नेमका विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे की, टॅब पुरवणाऱ्या ठेकेदार अन् त्याला मान्यता देणाऱ्या सदस्यांचा? याबाबत मात्र जोरदार चर्चा रंगली आहे. टॅब खरेदीच्या निर्णयाबरोबरच शाळांचे ऑडीट करुन शाळेच्या दुरुस्ती तसेच स्वच्छतागृह बांधणे, शाळांना एकच रंग देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याने या कामातूनही शिक्षण समितीचे भले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शिक्षण समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सोयीच्या निर्णयाच्या नावाखाली ठेकेदार पोसण्याबरोबरच “स्वहिता’च्या निर्णयांनाच मंजुरी दिली असल्याचेच समोर आले.
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढणार
शिक्षण समितीच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या बालवाडीतील मुख्य समन्वयक, विभागीय समन्वयक, सेविका अशा एकूण 212 कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने मान्यता दिली. पूर्वीच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
डिबीटी प्रक्रिया रद्द करण्यामागेही दडला स्वार्थ
मागील शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक साहित्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिबिटी पद्धतीने अर्थात विद्यार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत होते. मात्र, यावर्षीही ही पद्धत रद्द करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यासाठी निविदा पद्धत राबवावी अशी शिफारस शिक्षण समितीने केली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.