पुणे – राज्य शासनाने शालेय शिक्षण विभागासाठी नव्याने नियुक्त केलेल्या शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळांना अचानक भेटी देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा धडाकाच लावला आहे. विदयार्थ्यांमध्ये रमत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
शिक्षण आयुक्ताच्या दौऱ्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी राजश्री गावडे, केंद्रप्रमुख देवराम गायकवाड आदींचा सहभाग होता. खानापूर, पानशेत, वरसगाव, देशमुखवाडी या शाळांना अचानक भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेणे संदर्भात व चांगले अधिकारी बनवण्यासाठी कोणते गुण आवश्यक याचे सविस्तर मार्गदर्शन शिक्षण आयुक्तांनी केले. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकाने वेळेत उपस्थित राहणे व शिस्त पाळणे ही बाब ही गरजेचे आहे. भविष्यामध्ये शालेय शिस्त कठोरपणे पाळण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी स्वतः प्रतिज्ञा मुलांबरोबर घेतली.
आनंददायी उपक्रम अंतर्गत इंग्रजी नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. विद्यार्थ्यांना गणित, मराठी, सामान्य ज्ञान या विषयावरती चौकस प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून उत्तरे प्राप्त करून घेतली. अभ्यास करून आयुष्यात काय व्हायचे आहे असे प्रश्न विचारुन त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख या सर्वांनी समूह शाळा गुणवत्ता वाढवणे संदर्भात सविस्तर सूचनाही शिक्षण आयुक्तांनी दिल्या. शिक्षक स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, इंग्रजी उपक्रम, शिक्षक साहित्य संमेलन, सामान्यज्ञान परीक्षा, शिष्यवृती व प्रज्ञाशोध परीक्षा, लोकसहभाग चळवळ, कोडिंग, परकीय भाषा, जर्मन, मल्लखांब, केंद्रभेट उपक्रम, आनंददायी शनिवार या उपक्रमाबाबत माहिती घेऊन त्यांनी कौतुक केले.