पुणे – परदेशातील शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ झाली असतानाच डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे परदेशातील शिक्षण आता अतिशय महाग होणार आहे. त्याचबरोबर परदेशातील पर्यटनही रुपया घसरल्यामुळे महाग झाले आहे.
काही वर्षांपूर्वी रुपयाचे मूल्य स्थिर होते. त्यामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी शिक्षणासाठी कर्ज घेऊन सहज जाऊ शकत होते. मात्र आता रुपया घसरल्यामुळे डॉलरसाठी या विद्यार्थ्यांना अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. याचा लघु ते मध्यम पल्ल्यास परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याच कारणामुळे आता भारताबाहेर पर्यटनासाठी किंवा इतर कारणासाठी प्रवासही महाग होणार आहे. विमानाचे तिकीट घेण्यासाठी किंवा परदेशातील वास्तव्यासाठी डॉलर मिळविण्याकरिता अधिक रुपये मोजावे लागतील. त्यामुळे पर्यटन आणि प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र रुपया घसरल्याचे जसे काही तोटे आहेत तसे काही फायदे आहेत. भारतातील बरेच लोक परदेशात काम करतात. त्यांनी भारतात पाठविलेल्या डॉलरचे रुपयात रूपांतर होताना अधिक रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी भारतात जास्तीत जास्त डॉलर पाठवावे याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास काही प्रमाणात मदत मिळू शकणार आहे.
त्याचबरोबर भारतातून निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना या घडामोडीचा बराच फायदा होणार आहे. मात्र कंपन्या आणि व्यापाऱ्यांना आयात तितकीच महागात पडणार आहे. तेल कंपन्यांना तेलाची आयात महागात पडत असल्यामुळे आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर खाद्यतेल महाग झाले आहे. वाहन आणि इतर क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सुट्या भागाची आयात करावी लागते. ही आयात महागात पडत असल्यामुळे या उत्पादनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना अनेक उत्पादनाचे दर अगोदरच वाढले आहेत.