मुंबई – सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
दरम्यान भोसले यांच्यावर ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी 83 लाखांचा दंड ठोठावल होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता.