नवी दिल्ली : ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत छापासत्र राबविले. ईडीने सँटियागो मार्टिन आणि त्यांची कंपनी मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा.लि.शी संबंधित आज २२ ठिकाणी छापे टाकत १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाबसह आदी ठिकाणी शोध मोहीम राबवत छापेमारी केली. यावेळी ईडीने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याच कारवाई दरम्यान, ईडीने १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली.
पीएमएलए २००२ च्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, मार्टिन हे १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे असलेले राजकीय पक्षांना सर्वात मोठे देणगीदार होते. मात्र, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच ईडी २०१९ सून तामिळनाडूमध्ये या लॉटरी किंगची चौकशी करत आहे.