गुजरात दौर्यात राहुल गांधींनी परिणामांचा विचार न करता हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेता असल्यामुळे राहुल यांनी सरकारवर प्रखर आणि झोंबणारी टीका करणे अपेक्षित आहे. त्यांनी तसे केलेही आहे. त्यांच्या पात्रतेबद्दल शंका निर्माण व्हावी अशी पेरणी सर्व माध्यमातून करण्यात आल्यावरही राहुल हटले नाहीत व सरकार विरोधातील त्यांचा स्वर प्रबळ होत गेला. तथापि, त्यांनी आता जी टीका केली आहे ती भारतीय जनता पार्टीवर नाही. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस निष्ठावानांना हायसे वाटले असणार. तर राहुल यांच्या विरोधकांच्या मते किंवा राजकीय जाणकारांच्या मते राहुल यांनी स्वयंगोल किंवा इंग्रजीत ज्याला ‘सेल्फ गोल’ म्हणतात ते केले.
अर्थात, या टीकेकडे राहुल यांनी पाहण्याची आवश्यकता नाही त्याचे कारण गेल्या दशकात काँग्रेसचे झाले तेवढे नुकसान भरपूर आहे. आता खालच्या ठिसूळ मजल्यावर नवी इमारत उभारण्यापेक्षा नवा पाया घातला तरच काँग्रेससाठी ते हितावह ठरणार असून राहुल यांची त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली असावी असे प्रतित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असणार्या गुजरातमध्ये राहुल गेले होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनी होणार असल्या तरी तयारी सुरू करण्याची हीच योग्य वेळ. त्यानुरूप राहुल कामाला लागले.
सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करायची आणि मुद्दे शोधायचे अथवा निर्माण करायचे असा साधारण विरोधी पक्षांचा पॅटर्न असतो. राहुल यांनी त्यालाच फाटा दिला. ते म्हणाले की, गुजरातच्या काँग्रेस नेतृत्वात दोन प्रकारची माणसे आहेत. यातील एका प्रकारातील नेते जनतेसोबत उभे आहेत, त्यांच्या हृदयात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे असे काही नेते आहेत की त्यांची जनतेपासून नाळच तुटली आहे. यांच्यातील निम्मे जणांनी भाजपशीच हातमिळवणी केली आहे. पक्षाचा नेता म्हणून आता माझी ही जबाबदारी आहे की अशा लोकांना बाजूला करणे. तसे करताना 30-40 नेत्यांना पक्षातून काढावे लागले तरी काढले गेले पाहिजे. गुजरात राज्य हे एका ठिकाणी अडकून पडले आहे.
राज्याला बाहेर काढण्यात काँग्रेस पक्ष असमर्थ ठरला आहे. लोकांच्या काँग्रेस पक्षाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. प्रदीर्घ काळ देश चालवण्याचा अनुभव असणार्या पक्षातील आणि कुटुंबातील व्यक्ती जर आपल्याच पक्षाची जाहीर चिरफाड करत असेल तर त्याकडे अगदी सहजपणे पाहणे किंवा स्वयंगोल वगैरे अशी त्यांची संभवना करणे अगदीच अपरिपक्वतेचे लक्षण समजायला हवे. किंबहुना राहुल गांधी यांनी आपल्याच घरातील निखारे शोधण्याचा आणि त्यांना जाहीरपणे इशारा देण्याचा जो आणखी एक धाडसी प्रयत्न केला आहे त्यातून भविष्यात काँग्रेसचे आणि प्रबळ विरोधी पक्ष किंवा समर्थ राजकीय पर्याय मिळाल्यामुळे देशाचे कल्याणच होईल. मोदी पर्वाच्या उदयापासून म्हणजे 2014 पासून काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे.
मोदी यांच्या गुजरातमध्ये काँग्रेसची पराभवांची मालिका त्याच्याही दीड दशक अगोदर सुरू झाली. राहुल यांच्याकडे काँग्रेसचा सुकाणू आल्यापासून काँग्रेसचे तब्बल 49 पराभव झाल्याचे काही दिवसांपूर्वीच भाजपमधील एका गणिताचार्याने हिशेब करून सांगितले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मूठ बांधली गेली होती. त्यांना सत्तांतर घडवता आले नाही तरी भाजपची ताकद कमी करण्यात यश आले. भाजपच्या जेवढ्या जागा कमी झाल्या तेवढ्या काँग्रेसच्या वाढल्या आणि गेल्या दोन टर्ममध्ये अधिकृत विरोधी पक्षनेताही लोकसभेला मिळाला नव्हता तो राहुल यांच्या रूपाने सभागृहाला मिळाला.
लोकसभेतील एकजूट कायम राहिली असती तर महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये जे घडले ते घडले नसते आणि या तीनही राज्यांत काँग्रेस भक्कम झाली असती. मात्र, विरोधकांना दुही भोवली. राहुल यांचे गुजरात दौर्यातील जाहीर वक्तव्य त्या दुहीबाबत नाही, तर पक्षातील अंतर्गत दुहीबाबत आहे. पराभवाच्या कारणाचा अभ्यास करताना ईव्हीएम, मतदार याद्यांमधील विसंगती आदींकडे बोट दाखवले गेले. तथापि, पराभवाची हीच एकमेव कारणे नाहीत तर बर्याचदा आतली जमीन भूसभुशीत करून विरोधकाला आत प्रवेश करणे सोपे करणारेही आपल्याच स्वत:च्या पतनाला हातभार लावत असतात. काँग्रेसच्या राहुल कालखंडातीलच नाहीतर अगोदरच्या कारकिर्दीतील पराभवांबाबत हेच सत्य आहे की काँग्रेसजनांनीच काँग्रेसचा पराभव केला.
गुजरातमधील नेते भाजपला मिळाले हा राहुल यांचा संशय नसून त्यांना तशी खात्री आहे व तशीच खात्री पक्षाला झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांबाबतही झाली आहे. त्यांच्याकडे तसे पुरावे असल्याशिवाय ते असे बोलूच शकणार नाहीत. काँग्रेसला मोदींचे सरकार मध्येच कोसळेल अशा आशेवर बसून राहण्याची गरज नाही. मोदी सरकार तेवढे ठिसूळ पायावर उभेही नाही आणि समजा जर सरकार कोसळलेच तर पर्याय देण्याची काँग्रेसची आज तरी क्षमता नाही हेही दुर्लक्षित करता कामा नये.
त्यामुळे आपल्या घराची डागडुजी करणे किंवा नव्यानेच उभारणीच्या कामाला सुरुवात करणे हेच पर्याय काँग्रेसकडे आहेत. कुटुंबामध्येच नेतेपद देण्यापेक्षा नव्या चेहर्यांना पुढे आणण्याचे आणि त्यात सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचे सर्व पर्याय राहुल यांना करायचे होते ते पक्षातल्याच काहींनी हाणून पाडले हेही लपून राहिलेले नाही. जर राहुल यांना पक्षात राहून पक्षाची वासलात लावणार्या अशा नेत्यांची हकालपट्टी करून नवा एकसंध आणि विचारधारेला प्राधान्य देणारा पक्ष निर्माण करायचे सूचले असेल तर त्याचे लोकशाहीच्या अंगाने विचार करता स्वागतच केले पाहिजे. बदलासाठी कुठूनतरी सुरुवात करावीच लागते.