‘बुरा ना मानो होली है’च्या नावाखाली कोणत्याही प्रकारची चेष्टामस्करी करण्याचा परवाना दिला असला, तरी राजकारणात मुरलेल्या राजकीय नेत्यांनी होळीच्या निमित्ताने अशा प्रकारची चेष्टामस्करी करावी का, हा मात्र वादाचा विषय ठरू शकतो. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानामुळे विनाकारणच खळबळ माजली आणि नंतर आपण गमतीने हे विधान केले असा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या या विधानांवर ज्या विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्या पाहता राजकारणात अशाप्रकारे केलेली गंमत कशी विचित्र ठरू शकते हे सिद्ध झाले.
सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आमच्या सोबत यावे आम्ही त्यांना आळीपाळीने मुख्यमंत्री करू अशा प्रकारची ऑफर नाना पटोले यांनी दिली होती. सध्या महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसलेल्या नाना पटोले यांना अशा प्रकारची ऑफर देण्याचा अधिकार आहे की नाही हा जरी वेगळा विषय असला तरी त्यांनी दिलेल्या या ऑफरनंतर ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तातडीने प्रतिक्रिया देऊन नाना पटोले यांनी ही ऑफर जाहीर करून घाई केली असे म्हटले. एवढेच नाही तर खूप पूर्वीच एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाण्यास तयार होते आणि त्यांनी केंद्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेटही घेतली होती अशा प्रकारचे विधानही केले.
या विषयाची व्याप्ती वाढू लागल्यानंतर नाना पटोले यांनी सारवासारव करण्याच्या निमित्ताने आपण होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गंमत केली आणि ते विधान सीरियस नव्हते अशा प्रकारचा खुलासा केला. तरी या गमतीच्या निमित्ताने संजय राऊत यांनी जो दावा केला तो तर त्यांना मागे घेता येणार नाही. मुळात शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले होते. साहजिकच एकनाथ शिंदे त्यावेळी खरोखरच काँग्रेससोबत जाण्यास तयार होते का आणि त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेतली होती का हासुद्धा संशोधनाचा विषय ठरू शकतो. अर्थात, संजय राऊत आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयावर नेहमीच प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. तशाच प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी नाना पटोले यांच्या या ऑफरच्या विधानावरही दिली असावी.
काळाच्या ओघात त्या प्रतिक्रियाही मागे पडतात. नाना पटोले यांनी केलेल्या या विधानाची दखल काँग्रेसच्या नेत्यांनीही घेतली आणि अनेकांना ही गंमत आवडलेली नाही हे त्यांच्या देहबोलीवरूनही सिद्ध होते. मुळात नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदावर असताना त्यांनी या प्रकारचे विधान केले असते, तर त्याला काही अर्थ प्राप्त झाला असता. पण इतर कोणत्याही नेत्यांना विश्वासात न घेता त्यांनी अशा प्रकारचे विधान केल्यामुळे नाराजी निर्माण होणे साहजिक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी ही ऑफर गंभीर होती असे मानले तरी महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे स्वागत झाले असते का, हे कसे गृहीत धरता येईल? तरीही संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये या ऑफरवर प्रतिक्रिया व्यक्त करून जी मुळात गंमत होती ती गंमत अधिकच ताणण्याचा प्रयत्न केला.
अनेक वेळा आपल्या राजकीय नीतीचा भाग म्हणून राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असतात. यानिमित्ताने जी चर्चा निर्माण होते त्यामुळे काही काळ खळबळ माजते आणि संशयाचे वातावरण वाढू लागते. त्याचाच एक भाग म्हणून या सर्व राजकारणाच्या गमतीकडे पहावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी या गमतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्नच नाही असे म्हटले. अजित पवार यांनी मात्र याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही. कारण या प्रकारच्या गमतीकडे दुर्लक्ष करण्याचेच त्यांनी आजपर्यंत धोरण स्वीकारले आहे. एकीकडे राजकारणातील ही गंमत सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीसुद्धा अशाच प्रकारची गंमत सुरू केलेली दिसते.
‘माझे आता मन लागत नाही. मला फारसे महत्त्वही नाही’ अशा आशयाचे विधान त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावरूनच केले आहे. एकीकडे जयंत पाटील लवकरच शरद पवारांची साथ सोडून अन्य कोणत्या पक्षामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचे हे विधानही सूचक मानावे लागेल. अर्थात, अजूनतरी जयंत पाटील यांनी आपण गमतीने ते विधान केले असे म्हटलेले नाही आणि जयंत पाटील यांची नाराजीसुद्धा लपून राहिलेली नाही. सध्या सत्तेवर असलेली महायुती भक्कम असल्याने उर्वरित पाच वर्षे आपल्याला विरोधी बाकांवरच बसावयाचे आहे याची कल्पना असल्यानेच केवळ स्वप्नरंजन म्हणून अधूनमधून राजकारणात अशी गंमत केली जाते असे दिसते.
सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या सध्याच्या जगामध्ये काय खरे आणि काय खोटे याचे भान नसणारे सोशल मीडियाचे वापरकर्ते मात्र अशा प्रकारच्या गमतीवर विश्वास ठेवून ती सीरियसली घेतात आणि समाजात आणि राजकारणात विनाकारण संभ्रमाचे व संशयाचे वातावरण निर्माण होते हेसुद्धा या ठिकाणाहून नाकारून चालणार नाही. राजकारण गंमत नसून सीरियस आहे हे यानिमित्ताने सर्व राजकारण्यांना कळले तरी खूप झाले.