कलंदर : संवाद…

-उत्तम पिंगळे

महाराष्ट्राच्या सरदारांना दिल्लीहून फोन येतो, अलीकडेच त्यांच्या पक्षात कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आलेला आहे. (त्यांना मराठी समजतं)

सरदार : नमस्कार सर, कार्यकारी अध्यक्ष झाल्याबद्दल प्रथम आपले हार्दिक अभिनंदन!
अध्यक्ष : नमस्कार व आभार. म्हटलं नवी सूत्रे हाती घेतली आहेत तर हालचाल विचारून घ्यावी म्हणून फोन केला आहे. काय म्हणतोय महाराष्ट्र ?

सरदार : महाराष्ट्र काय, एक दुष्काळ सोडला तर काही प्रश्‍न नाही. पावसाची वाट पाहात आहोत.
अध्यक्ष : पण, आता बहुतेक पावसास सुरुवात झालेली आहे. बाकी आपलं कसं चाललयं?

सरदार : एकदम उत्तम. नवे सहकारी जमवून घेतले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी खूप फायदा होईल म्हणून यावेळी मी नारा देणार आहोत – पुन्हा एकदा फडणवीस, या वेळी दोनशे वीस.
अध्यक्ष : वा… वा… उत्तम, पण तुमचे सहकारी पक्ष आतापासूनच मुख्यमंत्री पदाबाबत बडबड करू लागले आहेत.

सरदार : होय, पण आता मी, ते व तुम्ही अशी चर्चा पुढे दिल्लीत करणार आहोत. त्यावेळी काढू काहीतरी मार्ग.
अध्यक्ष : हे बरोबर आहे, पण त्यांनाही मुख्यमंत्रिपद आलटून पालटून हवे आहे?

सरदार : अहो तसे तर आमच्या रिपाइंला ही हवे आहे. बोलायला काय सर्वच तयार आहेत. प्रत्यक्ष निवडणुका होऊ देत मग किती जागा मिळतात त्यानंतर पाहू.
अध्यक्ष : होय, पण जागावाटप तडजोडीचं काय?

सरदार : त्याची काळजी करू नका. माझ्याकडे फॉर्म्युला तयारच आहे तसेच इतर अनेक जण पक्षात सामील होत आहेत त्यामुळे काळजी नसावी. चर्चा तर आपल्या समोरच होईल.
अध्यक्ष : पण तुमचे ते सहकारी शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना आपल्या विरोधात बोलत आहेत. अलीकडे ते विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात सरकार विरोधात बोलत असताना दिसत होते.

सरदार : त्याचं काही नाही हो. त्यांची ती जुनीच सवय आहे. जास्त मनावर घेऊ नका.
अध्यक्ष : विरोधकांचीही जुळवाजुळव सुरू आहे. आता विरोधी पक्ष नेता झालाच आहे. इतर काही पक्ष सामील होत आहेत असे ऐकले.

सरदार : अहो तसं लोकसभेच्या निवडणुकीवेळीही होते. निवडणूक न लढवणारेही त्यांच्या बाजूने बोलणारे होते.
अध्यक्ष : नाही पण, म्हणतो सावध राहा. शेवटी लोकसभा व विधानसभा यात फरक आहेच. गाफील राहू नये. मागे नाही का 3 राज्यांत थोडक्‍यासाठी सत्ता गेली, तसे काही होऊ नये.

सरदार : त्याची काळजी करू नये. आता येथे विरोधी पक्ष तेवढा प्रबळ राहिलेला नाही.
अध्यक्ष : त्याचे सर्व श्रेय आपणापाशी जाते. पूर्ण पाच वर्षे खूप काही काम केलेले आहे. कित्येक संकटे आल्यावरही आपण त्यातून सहीसलामत बाहेर आलात.

सरदार : धन्यवाद, आपल्याकडून असे ऐकल्याने पाच वर्षे केलेल्या कामाचे चीज झाले असेच वाटते.
अध्यक्ष : बर आता आणखी काही नसेल तर फोन ठेवतो.

सरदार : आणखी काही नाही. आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र चोख व्यवस्था केलेली आहे. पाऊस व्यवस्थित पडो हेच मागणे मागणार आहे. पाऊस पाणी व्यवस्थित झाले तर काहीच प्रश्‍न राहणार नाही. (फोन ठेवतात)

Leave A Reply

Your email address will not be published.