62 वर्षांपूर्वी प्रभात : क्रांतिनेते कॅस्ट्रो क्‍युबाचे पंतप्रधान झाले

ता. 18, माहे फेब्रुवारी, सन 1959

हवामानाचा अचूक अंदाज सांगणारा उपग्रह

न्यूयॉर्क, ता. 17 – हवामानासंबंधाचे शंभर टक्‍के खरे ठरणारे अंदाज करण्यास उपयोगी पडणारा एक उपग्रह याच वर्षी केव्हातरी अंतरिक्षात सोडून देण्याची योजना अमेरिकन लष्कराने आखली असल्याचे कळते. हा उपग्रह जेव्हा अंतरिक्षात फिरू लागेल तेव्हा हवामानातील फेरबदलासंबंधाने केलेले भाकीत बहुतेक शंभर टक्‍के खरे ठरेल अशी आशा व्यक्‍त करण्यात येत आहे.

भारतीय चहाच्या निर्यातीत वाढ

नवी दिल्ली – भारतातून 1958च्या पहिल्या अकरा महिन्यांत 1957 पेक्षा 1 कोटी पौंड अधिक चहाची निर्यात झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 1958 या मुदतीत सुमारे 123 कोटी रुपये किमतीचा 45.4 कोटी पौंडावर चहा निर्यात झाला. 1957 मध्ये सुमारे तितक्‍याच किमतीचा 44.34 कोटी पौंड चहाची निर्यात झाली.

माल्टाची राज्यघटना रद्द करण्यास मंजुरी

लंडन – माल्टाची राज्यघटना रद्द करण्याचे विधेयक हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाने 273 वि. 220 मतांनी मंजूर केले. नियुक्‍त मंडळाचे सल्ल्याने माल्टाचा कारभार करण्याचे अधिकार गव्हर्नरला देण्यात आले आहे.

क्रांतिनेते कॅस्ट्रो क्‍युबाचे पंतप्रधान झाले

हॅवाना – क्रांतिकारकांचे नेते डॉ. फायडेल कॅस्ट्रो यांचा काल क्‍युबाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. डॉ. कॅस्ट्रो 32 वर्षांचे असून, वकिली सुरू करण्यासाठी पंतप्रधानकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या कॉर्डोना यांचे जागी कॅस्टो येत आहेत.

आयुर्विमा उतरवणाऱ्यांची संख्या वाढत आहे

नवी दिल्ली – आयुर्विमा उतरवणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे आयुर्विमा कॉर्पोरेशनच्या पत्रकावरून दिसते, असे उपअर्थमंत्री श्रीमती तारकेश्‍वरी सिन्हा यांनी लोकसभेत सांगितले. त्या म्हणाल्या, आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण केल्याने मंदी आलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.