48 वर्षांपूर्वी प्रभात | अंतराळवीर परतले

ता. 23, माहे जून, सन 1973

युद्धकैद्यांवर खटले भरण्याचा अधिकार बांगला देशालाच

कोपेनहॅगन, ता. 22 – भारताचे परराष्ट्र मंत्री स्वर्णसिंग यांनी येथे अशी आशा प्रकट केली की, पाक-युद्धकैद्यांचा व निराश्रितांचा प्रश्‍न न सुटण्यासारखा आहे, असे मला वाटत नाही. ते पुढे म्हणाले, पाक युद्धकैद्यांवर खटले भरावयाचे की नाही ते ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी बांगला देशाचा आहे. त्या कामी भारत सरकारलासुद्धा हस्तक्षेप करता येणार नाही. मग ते पाक-युद्धकैदी भारत भूमीवर असेनात का. तथापि, हा प्रश्‍न पेचप्रसंग सुटण्याचे मार्गात आडवा येणार नाही.

अंतराळवीर परतले

अमेरिकन टिकोंडेरोगा, बोटीवरून – स्कायलॅबमधील 28 दिवसांचा अवकाश प्रवास संपवून अंतराळवीर आज पॅसिफिक महासागरात यशस्वीपणे उतरले व ते अमेरिकन बोटीवर आले आहेत. अवकाश केंद्रातील दुरुस्ती त्यांनी पूर्ण केली. अवकाशात 28 दिवस राहण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला.

आफ्रिकनांना चौ एन लाय यांचा उपदेश व संदेश

टोकियो – चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी आफ्रिकन लोकांना सांगितले की, त्यांना स्वतंत्रपणे विकास करून घ्यावयाचा तर तो मार्ग दुःखाचा राहणार नाही. त्यांनी स्वतंत्र संघटना केली पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे. तर अखेर विजय त्यांचाच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.