विविधा : जी. एन. जोशी

– माधव विद्वांस

मराठीतील आद्य भावगीतगायक जी. एन. जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 6 एप्रिल, 1909 रोजी विदर्भातील खामगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद नारायण जोशी. त्यांचे वडील नारायण महादेव ऊर्फ अप्पासाहेब जोशी नावाजलेले वकील होते. वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व वकिलीची परीक्षाही पास झाले. मात्र त्यांचा ओढा लहानपणापासूनच गायनाकडे होता. त्यांच्या घराशेजारीच नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राहत. त्यामुळे तेथे अनेक कलाकार, साहित्यिकांचे जाणे-येणे असायचे. त्यामुळे त्यांना मास्टर कृष्णराव, मास्टर दीनानाथ, इ. अनेक दिग्गज कलाकारांच्या ओळखी झाल्या.

त्यांच्या वाड्यातच रामभाऊ सोहोनी यांनी गायनवर्ग सुरू केला. ते बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या परंपरेतील गायक होते. त्यामुळे सोहोनींकडे जोशींचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. उच्चशिक्षणासाठी पुण्यास फर्गसन महाविद्यालयात आले. त्यांनी या वास्तव्यात मिराशीबुवा, कृष्णराव पंडित, बापूराव केतकर इ. कलाकारांचे गायन ऐकले. त्यावेळी बालगंधर्वांनी आपल्या गायन-अभिनयाने 1926-27 च्या काळात मराठी मनावर मोहिनी घातली होती. त्यांचा प्रभाव जोशींवरही पडला. याच काळात छोट्या छोट्या मैफली करू लागले. त्यांनी प्रख्यात कवी हरिंद्रनाथ व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या “हारून उल्‌ रशीद’ या नाटकाच्या एका प्रयोगात फकिराची भूमिकाही केली होती. पुढे नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथे दिनकरराव पटवर्धन यांच्याकडे त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले.

“रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ या गीताला जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केले. हेच गाणे पहिले मराठीतील भावगीत समजले जाते. हे गीत त्यांचे मित्र कवी ना. ध. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून खासगी कार्यक्रमांतून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात एचएमव्ही ग्रामोफोन कंपनीच्या रमाकांत रुपजी ह्यांनी हे गाणे ऐकले. त्यांना ते खूप आवडले व ध्वनिमुद्रणासाठी जी. एन. यांना आमंत्रण दिले. सुरुवातीस दोन गाणी मुद्रित करायची असे ठरले होते. सायंकाळी चार वाजता सुरू झालेले ध्वनिमुद्रण पहाटे चारला संपले व आठ गाणी ध्वनिमुद्रित झाली. “शीळ’ गाणं 1931 पासून घरोघर जाऊन पोहोचले. जी. एन. ह्या एका गाण्यामुळे लोकप्रिय झाले. एचएमव्ही ग्रामोफोन कंपनीने त्यांना मानाने नोकरी दिली. नंतर एचएमव्ही कंपनीने त्यांना मराठी व शास्त्रीय संगीत विभागाचे अधिकारी बनवले.

ग्रामोफोनच्या जमान्यात मराठीचा बोलबाला त्यांच्यामुळेच झाला. त्यांनी आफ्रिकेतील दौऱ्यात केनिया, युगांडा आणि टांझानियात 49 गाण्यांचे कार्यक्रम केले. एचएमव्हीत जी. एन. यांनी 40 वर्षे काम केले. “आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ हे कवी यशवंतांचे गीत तसेच भा. रा. तांबे यांचे “डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका’ ही गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली.

“जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला’ हे गीतही त्यांनी गीता दत्त यांच्या स्वरात संगीतबद्ध केले. “स्वरगंगेच्या तिरी’ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे. जी. एन. जोशी यांच्यावरील “स्वरगंगेचा साधक’ माहितीपटही निघाला. 22 सप्टेंबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.