– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
हे जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ।।257।। हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ।।258।। हे चिखलेंवीण रोवितीं । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ।।259।।
काम आणि क्रोध या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार अधोरेखीत करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, हे काम आणि क्रोध मनुष्य प्राण्याला पाण्यावाचून बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि त्याला न कळत पूर्णपणे ग्रासून टाकतात.
हे काम आणि क्रोध कोणत्याही शस्त्राचा आधार न घेता संधी साधून मारतात. ते दोरखंडाशिवाय तुम्हाला बांधू शकतात. ज्ञानी पुरुषाला देखील प्रतिज्ञा करून ते नष्ट करतात म्हणजे त्यांच्यात देहबुद्धी उत्पन्न करतात. चिखलाचा आधार न घेता ते घट्ट रोऊन बसतात.
पाशा वाचून बंधनात अडकवितात. असे हे काम-क्रोध सर्वांच्या देहात गुढरूपाने राहत असल्यामुळे कोणाच्या अधीन होत नाहीत.