– हिमांशू
जाहिराती आणि सेलिब्रिटी हे अद्वैत आहे. कुठल्या कंपनीचा ब्रॅंड ऍम्बेसेडर कोण आहे, या गोष्टीला बॉलीवूडमध्येही खूप महत्त्व मिळतं म्हणे!
मध्यंतरी बॉलीवूडमध्ये बराच सावळा गोंधळ उडाला होता. म्हणजे स्टार मंडळींच्या चौकशा होणं, त्यांच्यात दोन गट पडणं, त्यांनी एकमेकांना उद्देशून “ट्विटणं’, एकमेकांना दूषणं देणं वगैरे सुरू होतं; परंतु याच काळात कुणाकडे किती जाहिराती आहेत? ऍम्बेसेडर म्हणून कोण आघाडीवर आहे? जाहिरातींच्या क्षेत्रात कुठला किंवा कुठली सेलिब्रिटी मागे पडली? अशा बातम्या वृत्तपत्रांच्या अर्थकारणासाठी राखीव असणाऱ्या जागेत छापून येत होत्या.
बॉलीवूड बदनाम होत असल्याची चिंता ज्या मंडळींना लागून राहिली होती, त्यांनी या बातम्या वाचल्या असत्या तर त्यांना पटलं असतं, की एकवेळ बॉलीवूड बदनाम होऊ शकेल… पण स्टार कधीच बदनाम होत नसतात! असो, या “स्टार वॉर’मधलं एक प्रकरण ट्विट करण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांचंही होतं.
सेलिब्रिटींचा लोकांवर पगडा असतो आणि त्यांच्या ट्विटमुळे लोक प्रभावित होत असल्यामुळे त्या मोबदल्यात त्यांना कथितरीत्या पैसे दिले जातात, असा या अल्पकाळ टिकलेल्या चर्चेतला मुख्य आरोप होता. परंतु भारतातले लोक राजकीयदृष्ट्या या सेलिब्रिटींपेक्षा खूप “पुढचे’ आहेत. सेलिब्रिटीला जाहिरातीत पाहून ते शीतपेय खरेदी करतील; पण त्याच्या सांगण्यावरून माणसं राजकीय विचार बदलतात, असं मानणं हा भाबडेपणाच!
एखाद्याचा सेलिब्रिटी म्हणून खरोखर समाजमनावर किती पगडा असतो, हे पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं दाखवून दिलं. त्यानं शीतपेयाची जाहिरात केली नाही; उलट पत्रकार परिषदेवेळी टेबलावर ठेवलेल्या शीतपेयाच्या दोन बाटल्या हटवून पाण्याची बाटली उंचावली आणि “पाणी प्या,’ इतकंच म्हणाला. एवढ्या एका कृतीमुळे त्या शीतपेयाच्या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी कोसळले आणि कंपनीला 29 हजार 352 कोटींचा फटका बसला. कंपनीची एकूण किंमत 242 दशलक्ष डॉलरवरून 238 दशलक्ष डॉलरवर आली. याला “प्रभाव’ म्हणणं उचित ठरेल.
लोकांनी कार्बनयुक्त शीतपेयं न पिता पाणी प्यावं, असं त्याला वाटतं आणि त्यानं ते अगदी थोडक्यात सांगितलं. कार्बन डाय ऑक्साइडयुक्त शीतपेयांविषयी रोनाल्डोच्या या भावना आजच्या नाहीत. गेल्या वर्षी त्यानं “माझा मुलगाही चांगला फुटबॉलपटू बनू शकतो; पण त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसल्यामुळे माझी चिडचीड होते,’ असं सांगितले होते. “प्रभाव’ असा-तसा निर्माण होत नसतो. आपल्याकडे शीतपेयं प्यायल्यानंतर अंगात प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि कॉन्फिडन्स संचारतो, हे खरं वाटण्याइतपत वातावरणनिर्मिती झालेली आहे.
आपल्या आवडते “सिक्स पॅक’वाले सगळे हिरो सकाळी उठल्यापासून ही शीतपेयं घेत असावेत, असं मनापासून वाटणारे लोक आहेत. पण त्यासाठी वर्षानुवर्षें जाहिरातींचा भडीमार करावा लागलाय. या पार्श्वभूमीवर, समोर ठेवलेल्या शीतपेयाच्या दोन बाटल्या केवळ बाजूला करण्याची रोनाल्डोची कृती आणि तिचे तातडीचे दिसलेले परिणाम काहींच्या डोळ्यात खुपणारे; पण अनेकांच्या डोळ्यात भरणारे!