सैन्यात भरती होऊन देशाच्या शत्रूंशी लढण्याची इच्छा बऱ्याच तरुणांना असते. परंतु सैन्यात भरती होणं हीच एक लढाई असते. मॉर्निंग वॉकसाठी जे लोक नियमितपणे घराबाहेर पडतात, त्यांना कधी ना कधी अचानक चाळीस-पन्नास तरुण रस्त्यानं धावताना दिसलेले असतीलच. त्यांच्या बरोबर मोटारसायकलवरून एक इन्स्ट्रक्टर असतो आणि तो धावणाऱ्या तरुणांना सूचना देत असतो. ही पोरं लष्करात किंवा पोलिसात भर्ती होण्यासाठी मेहनत घेत असतात.
कुठल्यातरी अकॅडमीत प्रवेश घेऊन भर्तीपूर्व निवासी प्रशिक्षण घेत असतात. धावण्यापासून भालाफेक, गोळाफेक अशा मैदानी खेळांचा आणि लेखी परीक्षेचा सराव करता-करता दिवस कधी कलला हे या पोरांना कळतसुद्धा नाही. थकून-भागून झोपायचं आणि पुन्हा पहाटे बारा-पंधरा किलोमीटर धावण्यासाठी खडबडून उठायचं, असा त्यांचा दिनक्रम सुरू असतो. वय उलटून जाण्यापूर्वी भर्ती झालंच पाहिजे, याचा ताण त्यांच्या मनावर असतो.
परंतु सैन्य भरतीसाठीचं वय उलटून गेलं म्हणून एका बहाद्दरानं केलेल्या “भलत्याच’ लढाईची सध्या जोरदार चर्चा आहे. लष्करातच काय, कोणत्याही नोकरीसाठी एकदा वय उलटून गेलं, की त्या नोकरीसाठी पुढल्या जन्मीच प्रयत्न करावा लागतो. परंतु राजस्थानातल्या या पठ्ठ्यानं याच जन्मी दुसरा जन्म घेतला. अर्थातच जन्म घेण्यापूर्वी त्याला “मरावं’ लागलं आणि नवीन नाव धारण करून “पुन्हा जन्माला आल्यावर’ नवी जन्मतारीख मिळवण्यासाठी दहावीची परीक्षाही द्यावी लागली.
हा “वीर’ बरेच खटाटोप करून सैन्यात भर्ती होण्यात यशस्वी झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालनालयाला एक पत्र मिळालं आणि त्यानंतर या “लढाई’चा उलगडा झाला. महाशयांचं “मृत्यूपूर्वीचं’ नाव मोइनुद्दीन. “पुनर्जन्मानंतरचं’ नाव मोहिन सिसोदिया. मूळ जन्म 1998 चा. त्याच्या पाठीला पाठ लावून 2001 मध्ये जन्माला आलेला धाकटा भाऊ 2018 मध्ये सैन्यात भर्ती झाल्याचं पाहून मोइनुद्दीनच्या मनात दडलेल्या स्वप्नानं पुन्हा उचल खाल्ली. खरं तर त्याचं भर्तीचं वय उलटून गेलं होतं. परंतु पुन्हा जन्माला यायचंच, असं त्यानं ठरवलंच होतं त्याला कोण काय करणार!
सरपंचाशी हातमिळवणी करून 18 ऑगस्ट 2019 रोजी तो “मरण पावला’. तहसीलदारांपर्यंत कागद हलले तरी कुणालाच संशय आला नाही आणि अखेर मोईनुद्दीनचं मृत्यू प्रमाणपत्र तयार झालं. त्याच वर्षी शेजारच्या गावातल्या शाळेतून मोहिन सिसोदिया दहावी परीक्षा पास झाला. दहावीच्या फॉर्मवर आणि ओघानेच त्याच्या गुणपत्रिकेवरही 6 नोव्हेंबर 2001 अशी जन्मतारीख नोंदवली गेली. दरम्यान, आधार कार्डावरचं नाव आणि जन्मतारीखही त्यानं बदलून घेतली. वयाच्या 24 व्या वर्षी तो पुन्हा 22 वर्षांचा झाला आणि सैन्यात दाखलही झाला. अवघ्या दोन वर्षांचा फरक दडपण्यासाठी केवढी मोठी लढाई!
मोइनुद्दीन ऊर्फ मोहिनचं प्रकरण आता पोलीसजमा झालंय. तपासात ज्या गोष्टींचा खुलासा झालाय, त्यातली एक खूपच महत्त्वाची आहे. कोविडमुळे अनेक तरुणांच्या आयुष्यातली दोन वर्षे कुरतडली गेलीत. याच काळात त्यांचं वय उलटून गेलंय. स्वप्नं चिरडलीत. ज्या देशाचं सरासरी वय 25 वर्षे आहे, अशा तरुणांच्या देशातले धोरणकर्ते मात्र कोविडमुळे निराश झालेल्या पोरांबाबत अजिबात गंभीर नाहीत. “डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वगैरे शब्दांपर्यंत पोहोचण्यासाठी तर त्यांना “लढाई’च करावी लागेल!