61 वर्षापूर्वीं प्रभात : चीनशी वाटाघाटी करू पण सौदा करणार नाही

ता. 09, माहे मार्च, सन 1960

सीमाप्रश्‍नावर सरकारी ठराव

मुंबई, ता. 8 – मुंबई-म्हैसूर सीमा प्रश्‍नाबाबत मुंबई सरकारची भूमिका स्पष्ट करणारा प्रस्ताव आपण मांडणार आहोत, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुंबई विधिमंडळात जाहीर केले. ते म्हणाले, बेळगावात व सीमेवरील इतर भागात काय चालू आहे व तेथील लोकांच्या भावनांबाबत आम्ही बेसावध नाही. दरम्यान दिल्लीची बातमी अशी आहे की, म्हैसूरचे कॉंग्रेसी खासदारांचे शिष्टमंडळ नेहरू व पंत यांना लवकरच भेटून म्हैसूर व मुंबई सीमा प्रश्‍नाबद्दल चर्चा करील.

चीनशी वाटाघाटी करू पण सौदा करणार नाही

हैदराबाद – संरक्षणमंत्री व्ही. एन. कृष्णमेनन म्हणाले, चिनी पंतप्रधान भारताला भेट देण्यास येत आहेत. अशा वेळी आम्ही त्यांचे आमच्या प्रतिष्ठेला साजेसे स्वागत करू. आमच्या सरहद्दीचा भंग झालेला आम्हाला सहन होणार नाही. परंतु याबाबत आम्ही वाटाघाटी करण्यास आढेवेढे घेणार नाही. इतके आमचे मन कमकुवत नाही. मात्र आम्ही धमक्‍यांना भिऊन कोणा राष्ट्राशी सौदा करणार नाही.

अगादीर जवळ समुद्र उकळू लागला

अगादीर – अगादीरपासून दोन मैलावर समुद्र उकळत असून तेथून वाफाची वलये एकसारखी आकाशात जात आहेत. पाण्याखाली ज्वालामुखी रटरटत असावा असा तर्क करण्यात येत आहे. एका टेकडीवरील पहारेकऱ्यांना वाफेचे लोट प्रथम दिसले. युवराज मोले हसन यांनी या भागावरून उड्डाण करून वाफा उसळत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. एक फ्रेंच विनाशिका या भागातून दुसरीकडे गेली. उकळता समुद्र टाळण्यासाठी ही नौका अन्यत्र नांगरण्यात आली. येथे 29 फेब्रुवारीला भूकंप झाला तेव्हाच समुद्रतळाशी मोठे फेरफार होत असल्याचे आढळून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.