लोथल येथील उत्खनन
अहमदाबाद, ता. 12 – अहमदाबादपासून 48 मैलांवर असलेल्या लोथल येथील उत्खननाचे काम मध्यवर्ती पुराणवस्तु खात्याने पुरे केले आहे. गेल्या 25 वर्षांत खात्यातर्फे एवढे मोठे उत्खनन झालेले नाही. मिळालेल्या मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणाची व्यवस्था करून तज्ज्ञांच्या छावण्या गुंडाळण्याचे काम सुरू झाले आहे.
हडप्पा संस्कृतीच्या फार मोठ्या स्थानाचा शोध येथे हाती आला आहे. सापडलेल्या 17 हजार पुराणवस्तुंचा अभ्यास सुरू झाला आहे. या जागेवर 5 लाख खर्च करून पदार्थसंग्रहालय बांधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबई सरकार पाहावयास येणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिथिगृह बांधणार आहे. सरकार या भागात जोडरस्तेही तयार करणार आहे. सिंधू खोऱ्याची संस्कृती हडप्पा मोहेंजो दारो येथे ख्रिस्तपूर्व 1500 वर्षांच्या सुमारास अकस्मात खलास झाली. परंतु लोथल येथे त्यानंतर आणखी 500 वर्षे तरी ती अस्तित्वात होती, असे लोथल येथील शोधावरून दिसते.
पृथ्वीचे वय साडेचार अब्ज वर्षे
मॉस्को – पृथ्वीचे वय साडेचार अब्ज वर्षे असावे असे लेनिनग्राडच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. आर्टिक सागराच्या किनाऱ्यावरील खडकांच्या भूस्तर शास्त्रीय अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विविध खडकांच्या वयोमानाची 550 गणिते सोव्हिएत विज्ञानधामाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली.
या खडकातून अभ्रक काढून घेण्यात आले व खडक वितळवून ऍर्गान (एक प्रकारचा वायू) दूर करण्यात आला. अभ्रकांतील पोटॅशियमचे प्रमाण रासायनिक पद्धतीने ठरविण्यात येते. ऍर्गान व पोटॅशियमच्या प्रमाणावरून त्या खडकाचे वय ठरविता येते. या पद्धतीने भूस्तरातील लोह, तांबे, निकेल, अभ्रक वगैरे खनिजांचेही प्रमाण ठरविता येते.
नव्या ताऱ्याचा शोध
मॉस्को – एम. वरिमोव हे नं. 1949 या मंदताऱ्याची छायाचित्रे घेत असता आजवर कॅटलॉगमध्ये नोंद नसलेला असा एक मंदतारा त्यांना आढळला. कझक शास्त्रज्ञांनी बनविलेल्या उपकरणाने ही छायाचित्रे घेतली.