अग्रलेख : बॉलीवूडमधील दिग्गजांनी मौन सोडावे!

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर गेल्या दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीविषयी जी नकारात्मक चर्चा सुरू आहे, त्याबाबत आता बॉलीवूडमधील दिग्गजांनी समोर येऊन बोलण्याची गरज आहे. 

जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी भारतात तेही महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत केंद्रित झाली असूनही या चित्रपटसृष्टीचा भाग असणारे दिग्गज कलावंत कधीही सामाजिक गोष्टीवर आपले मत व्यक्‍त करत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या चित्रपटसृष्टीबाबतच नकारात्मक चर्चा सुरू होते तेव्हा तरी त्यांनी कर्तव्य भावनेतून समोर येऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे. सुशांतसिंह आत्महत्येच्या निमित्ताने बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्‍शनचा जो विषय समोर आला आहे, त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक लोक संशयाच्या भोवऱ्यात आहेत. परिणामी संपूर्ण चित्रपटसृष्टीकडेच संशयाने पाहिले जात आहे, हे थांबवायचे असेल तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आता समोर येण्याची गरज आहे. या विषयावर आतापर्यंत ज्या ज्या कलाकारांनी आपापले मत मांडले आहे, ते कलाकार एक तर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्याच भूमिकेतून आपली मते मांडत आहेत. 

समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत याविषयी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि बॉलीवूडमधील काही कलाकार बॉलीवूडला बदनाम करत असल्याबद्दल चिंता व्यक्‍त केली. त्यांचा रोख बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्‍शन उघड करणारी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या या भूमिकेला समर्थन देणारा भाजपचा खासदार अभिनेता रवी किशन यांच्या दिशेने होता. रवी किशन किंवा मनोज तिवारी हे भाजपचे खासदार असले तरी तेसुद्धा चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचे घटक आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीला जिवंत ठेवण्याचे काम या कलाकारांनी केले आहे; पण आपली भूमिका मांडताना त्यांनी ती कलाकारांची भूमिका न मांडता राजकीय नेत्याच्या भूमिकेतून आपले मत व्यक्‍त केल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका येऊ शकते. 

हिंदी चित्रसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील संवादामध्ये अतिशय परखड मते व्यक्‍त करीत कंगना राणावतचे ढोंग उघड करण्याचा प्रयत्न केला. उर्मिला मातोंडकरने गेली लोकसभा निवडणूक मुंबईतून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यामुळे तिच्याकडून अशाप्रकारची मते व्यक्‍त होणे साहजिकच होते. जया बच्चन, रवी किशन, मनोज तिवारी किंवा उर्मिला मातोंडकर हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानेच त्यांनी चित्रपटसृष्टीच्या बदनामीबाबत भूमिका घेतली आहे. पण या सर्व कलाकारांपेक्षा बॉलीवूडमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या कोणत्याही अभिनेत्याने अथवा कलावंताने मतप्रदर्शन केलेले नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. जया बच्चन यांचे पती आणि या शतकाचा महानायक असणारे अभिनेते अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही वादग्रस्त विषयावर टिप्पणी करत नाहीत. यावेळीसुद्धा त्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. 

सोशल माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या आणि प्रचंड प्रमाणात फॉलोअर्स असलेल्या अमिताभ बच्चन यांनी साधे ट्‌विट करूनही कंगनाच्या विधानाचा अथवा कृतीचा निषेध केलेला नाही. चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव असणाऱ्या खान मंडळींनीही कोणतेही मत व्यक्‍त केलेले नाही. शाहरुख खान आणि सलमान खान शक्‍यतो कोणत्याही वादग्रस्त विषयात पडण्याचे टाळतात. आमिर खान मात्र वेळोवेळी आपली मते व्यक्‍त करत असतो. यावेळी चित्रपटसृष्टीशी संबंधित विषय असूनही आमिर खानने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्‍त केलेली नाही, हे विशेष. भारतात किंवा महाराष्ट्रात कोठेही काही घडले तर लगेच व्यक्‍त होणारे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट अथवा गीतकार जावेद अख्तर अथवा नेहमी सरकारच्या बाजूने बोलणारे अभिनेते अनुपम खेर यांच्यापैकी कोणीही बॉलीवूडची बदनामी होत असताना पुढे येऊन बोलण्याचे धाडस दाखवले नाही, हीसुद्धा आश्‍चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. 

कंगना राणावतने जो ड्रग्ज कनेक्‍शनचा विषय समोर आणला त्यानंतर सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी या कनेक्‍शनच्या बाबतीत रिया चक्रवर्तीसह 6 लोकांवर कारवाई करण्यात आली. म्हणजेच चित्रपटसृष्टीत अंमली द्रव्यांचा प्रभाव आहे, हे उघड झाले. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक अभिनेत्यांच्या दिशेने बोटे रोखली गेली. त्यापैकी कोणीही साधी प्रतिक्रियाही व्यक्‍त केली नाही किंवा आरोप खोडून काढला नाही, हे विशेष. सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर जेव्हा सर्वप्रथम बॉलीवूडमधील घराणेशाहीबाबत चर्चा सुरू झाली होती, तेव्हाही कोणीही तोंड उघडले नव्हते आणि आता बॉलीवूडमधील अंमलीपदार्थांचा प्रभाव हा नकारात्मक विषय समोर येत असतानाही एकाही दिग्गजांना तोंड उघडून बॉलीवूडचा बचाव करावासा वाटत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कदाचित आपण एखादी भूमिका घेतली तर आपण एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने बोलत आहोत, असा समज निर्माण होण्याच्या भीतीने हे दिग्गज कलाकार बोलत नसावेत; पण पडद्यावर स्टार, सुपरस्टार आणि सुपर हिरोसारख्या भूमिका बजावणाऱ्या या कलावंतांनी अशा क्षुल्लक गोष्टींनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. 

भारतातील कोट्यवधी जनता या कलाकारांना रोल मॉडेल मानते. पडद्यावर अतर्क्‍य अशा करामती आणि पराक्रम करणारे हे कलाकार प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र महत्त्वाच्या विषयावर मौन बाळगण्याचा पर्याय स्वीकारत असतील तर सामान्य नागरिकांचा निश्‍चितच भ्रमनिरास होणार आहे. इतर कोणत्याही क्षेत्राची अशा प्रकारे बदनामी जर होत असती तर त्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी समोर येऊन ही बदनामी थांबवण्याचा निश्‍चितच प्रयत्न केला असता. त्यामुळे आता बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनीही समोर येण्याची हीच वेळ आहे. 

आपल्या चित्रपटसृष्टीला शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. त्या चित्रपटसृष्टीची बदनामी गेल्या दहा-बारा वर्षांत काम करून लोकप्रिय झालेली कंगनासारखी एखादी अभिनेत्री करत असेल तर या गोष्टीवर कोठेतरी नियंत्रण ठेवावे लागेल आणि हे काम बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारच करू शकतील. हे कलाकार पुढे येतील अशी किमान अशा करायला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.