अग्रलेख : समुपदेशनाची वाढती गरज

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घटनांवर नजर टाकली तर समाजातील सर्वच घटकांना समुपदेशन देण्याची गरज आहे, ही गोष्ट अधोरेखित झाल्याशिवाय राहात नाही. राशीन (ता. कर्जत) येथील एका डॉक्‍टराने केवळ आपल्या मुलाच्या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंबाची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना मन हेलावून टाकणारी असली तरी त्याच वेळी समाजमन किती कमकुवत झाले आहे, हे सिद्ध करणारी आहे. 

दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचे नाणे बाहेर काढायला लावले. 2021 या आधुनिक वर्षातही जर सीतेला अशी अग्निपरीक्षा द्यावी लागत असेल तर समाजमन किती मागास आहे, ही गोष्टही यातून सिद्ध होते. कोणत्याही साध्या गोष्टीने स्वतःचे किंवा इतरांचे जीवन संपवायला लोक का प्रवृत्त होतात याचा सामाजिक शोध घेतला जात असतानाच समाजातील सर्वच घटकांना आता मानसिक समुपदेशनाची गरज असल्याची गोष्ट समोर येऊ पाहत आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतासह जगात सर्वत्रच करोनाच्या महामारीने समाजातील सर्वच व्यवस्था कमकुवत आणि खिळखिळी केली असताना जगायचे कसे, हा प्रश्‍न समाजातील सर्वच घटकांना पडला आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर आता कुठे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था सावरायला लागली असताना पुन्हा एकदा भारताच्या विविध भागांमध्ये करोनाचे संकट वाढू लागले आहे. करोना संपला या विचाराने नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लागण्याचा विचार करणाऱ्या समाजातील सर्वच घटकांसाठी हा आणखी एक झटका मानावा लागेल. 

सरकारमधील विविध मंत्र्यांची वक्‍तव्ये पाहता राज्यात कधीही पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या कालावधीमधील परिस्थिती पाहता लोकांना पुन्हा एकदा त्याच नकारात्मक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षभरातील विविध आरोग्य संस्थांनी केलेल्या सर्व्हेप्रमाणे या कालावधीमध्ये लोकांच्या मानसिक आरोग्याचे काही प्रमाणात खच्चीकरण झाल्याचे निष्कर्ष समोर आले होते. नव्या वर्षात नव्या उमेदीने कामाला लागण्याची तयारी सुरू असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाले तर लोकांना याच मानसिकतेशी सामना करावा लागणार आहे. सरकार सध्या ज्याप्रमाणे करोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे, त्याचप्रमाणे सरकारने स्वतःहूनच समाजातील सर्व घटकांचे समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

आपल्या हाती उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांना सकारात्मक पद्धतीने जगावे कसे, हे शिकवण्याची आणि समजून सांगण्याची हीच वेळ आहे. वर उल्लेख केलेल्या डॉक्‍टर कुटुंबाची हत्या आणि आत्महत्या असो किंवा एका स्त्रीला तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी द्यावी लागणारी अग्निपरीक्षा असो, आज समाजमनाचा आरसा या घटनांमधून प्रतीत होतो. एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अशा प्रकारची घटना खूपच कमी प्रमाणात घडत असल्या तरी अशा घटना घडल्यानंतर त्या घटनांच्या बातम्या वाचून किंवा त्या विषयाचे विश्‍लेषण वाचून लोकांची मानसिकता बदलली जाऊ शकते. 

मानसिकता नकारात्मक न होता सकारात्मक व्हावी यासाठीच समुपदेशनाची गरज आहे. समाजातील सर्वच घटक आपापल्या पातळीवर ही समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडू शकतात. सरकारी कार्यालये, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था आणि या शैक्षणिक संस्थांच्या अखत्यारितील शाळा व महाविद्यालये या सर्वच क्षेत्रामध्ये जर समुपदेशनाची ही प्रक्रिया व्यापकपणे राबवण्यात आली तर समाजमन निरोगी आणि सकारात्मक होऊ शकेल. सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल माध्यमांचा वापरही या प्रक्रियेसाठी अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकेल. समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आलेली कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होऊन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेचा आणि समाजाच्या आरोग्याविषयी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी समुपदेशन करण्यासाठी या सोशल माध्यमांचा वापर केला तर तो कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. 

आज समाज माध्यमांवर अनेक वेळा अफवा आणि चुकीच्या बातम्या यांचा भडिमार असतो. आपण जे काही वाचत आहोत ते चूक आहे की बरोबर, हे समजून न घेता ते फॉरवर्ड करण्याकडे अनेकांचा कल असतो. चुकीची माहिती आणि चुकीचे ज्ञान मिळाले तर समाजमन कलुषित होऊ शकते, यासाठीही अशा प्रकारच्या अधिकृत समुपदेशनाची गरज आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशांमध्ये कोणत्याही विषयांत राजकारण केले जात असल्याने एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू समोर येत असतात. त्यापैकी कोणती बाजू खरी आणि कोणती बाजू खोटी हे समजण्याची मानसिक क्षमता जर समाजाची नसेल तर विनाकारणच पूर्वग्रह तयार होऊन समाजामध्ये दुही निर्माण होण्याची भीती असते. वरील प्रकारच्या गोष्टी घडू नयेत यासाठीही समुपदेशनामध्ये त्याचाही विचार करण्याची गरज आहे. 

सध्या समाज माध्यमातून लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. हेसुद्धा एक प्रातिनिधिक उदाहरण मानावे लागेल. गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला आणि लोकांचा लगेच त्यावर विश्‍वास बसला. हा व्हिडिओ जुना असल्याचा खुलासा प्रशासनाला करावा लागला. हा खुलासा किती लोकांनी बघितला, हा पण संशोधनाचा विषय असू शकतो. समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या मजकुरावर विश्‍वास ठेवण्याची सवय समाजाला लागली आहे. पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासन नेहमीच लोकांनी अधिकृत सूत्रांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन करत असले तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. कोणत्या माहितीवर विश्‍वास ठेवायचा आणि कोणती माहिती थेटपणे नाकारायची याबाबतही समाजाचे समुपदेशन करण्याची गरज सध्याच्या काळात निर्माण झाली आहे.

जगातील इतर अनेक मोठ्या आणि प्रगत देशांमध्ये जेव्हा एखादी नैसर्गिक दुर्घटना घडते किंवा मोठी आपत्ती येते त्यानंतर लगेचच लोकांची मानसिकता मजबूत करण्यासाठी अशा प्रकारची समुपदेशनाची मोहीम राबवण्यात येते. भारतासारख्या मोठ्या देशांमध्येही ही गरज आता प्रकर्षाने समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.