विविधा : संत कवी श्रीधर

-माधव विद्वांस

“हरिविजय’, “रामविजय’, “पाण्डवप्रताप’, “जैमिनी अश्‍वमेध’ तसेच “शिवलीलामृत’, “व्यंकटेश महात्म्य’ यांसारखे ग्रंथ लिहिणारे संत कवी श्रीधर यांची माहिती फारशी कुणाला नाही, तसेच संतपरंपरेतही त्यांचा फारसा उल्लेख होत नाही. त्यांना श्रीधरस्वामी असेही म्हणतात. 

साधारण 70 वर्षांपूर्वीपर्यंत या पोथ्यांचे वाचन विशेष करून चातुर्मासात घरोघरी होत असे. पण त्यावेळीही या पोथी लेखकाचे नाव व इतिहास कोणालाही माहीत नसायचे. पुण्याच्या तुळशी बागेतही त्यांचे वाचन होत असे. तसेच अनेक घरांतही हे ग्रंथ असायचे. अत्यंत रसाळ भाषेत भक्‍तिरसाचा त्यांच्या पोथीमुळे भाविकांना लाभ व्हायचा. श्रीधरांचे निर्वाण होऊन 290 वर्षे होत आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्‍त या ग्रंथाची पारायणे करतात. श्रीधरांनी लिहिलेल्या “शिवलीलामृत’ या ग्रंथाला 23 फेब्रुवारी 2021 रोजी 302 वर्षे पूर्ण होत आहेत.

काशी विश्‍वेश्‍वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. शिवलीलामृतात 14 अध्याय असून एकूण 2 हजार 450 ओव्या आहेत. “व्यंकटेश महात्म्य’ त्यांनी बागलकोट येथे लिहिले होते. नाझरेकर कुलकर्णी घराण्यांत कवी श्रीधर जन्माला आले. त्यांचे मूळ आडनाव खडके होते. त्यांच्या घराण्यातील एक पुरुष घोडदळात अधिकारी बनल्याने घोडके आडनाव पडले. त्यानंतर राघोपंत नाझर एका महालाचे कुलकर्णी बनल्यावर त्यांना नाझरेकर म्हणू लागले. त्यांच्या जन्मशकाविषयी विद्वानांत एकमत नाही. कुणी त्यांचा जन्मशक 1580 हा मानतात तर काहींच्या मते तो शके 1600 असावा, श्रीरंगनाथ स्वामी निगडीकर हे प्रसिद्ध सत्पुरुष देखील याच घराण्यात जन्माला आले.

श्रीधरांच्या वडिलांचे नाव ब्रह्मानंद व आईचे सावित्रीबाई. ब्रह्मानंद हे नाझरे गावचे कुलकर्णी. पंढरपूरच्या पश्‍चिमेस नाझरे हे गाव सोळा कोस अंतरावर आहे. श्रीधरांचे वडील ब्रह्मानंद हेही भक्‍तिमार्गातील होते. संसारी असूनही ते विरक्‍त असायचे. मात्र उतारवयात त्यांनी खरोखरीच संन्यास घेतला आणि ते लवकरच भीमातीरी समाधिस्थ झाले. श्रीधरांच्या मातोश्री सावित्रीबाई या देखील धर्मनिष्ठ स्त्री होत्या.

यथावकाश श्रीधरांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. श्रीधरांनी जनरूढीप्रमाणे अनेक वर्षे संसार केला. त्यांना मुलेही झाली. परंतु श्रीधरांचे लक्ष संसारात फारसे नसायचे. कारण त्यांचे सारे चित्त अध्यात्ममार्गाकडे लागले होते. त्यांनी वडिलांकडूनच गुरूपदेश घेतलेला होता. श्रीधरांनी हीच परंपरा पुढे चालविली व जन्मदात्या पित्यालाच गुरू करून त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला व पुढे चित्तशुद्धीसाठी अनेक तीर्थयात्रा करून ते पंढरपूर येथे स्थायिक झाले.

कवी श्रीधरांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी स्वतःदेखील संस्कृत भाषेत काही ग्रंथरचना केलेली आहे. कवी श्रीधर यांचे शेवटचे वास्तव्य पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिराजवळ कुंभारघाटावर असलेल्या घरात होते. त्याच घरात सध्या त्यांची नववी पिढी राहते आहे. त्यांच्याकडे कवी श्रीधर यांच्या शिवलीलामृत आणि मल्हारी माहात्म्य या पोथ्या आजही जपून ठेवलेल्या आहेत. ते पंढरपूर येथे तारखेप्रमाणे 26 जानेवारी रोजी समाधिस्त झाले. (तिथी माघ वद्य तृतीया किंवा चतुर्थी) त्यांची घराजवळच समाधी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.