सोक्षमोक्ष : “संशयबळीं’च्या यातना

– सत्यजित दुर्वेकर

कोणत्याही नात्यात संशयाची पाल चुकचुकली की ते नातं फार काळ टिकत नाही. केवळ संशयावरून स्त्रियांचा होणारा छळ प्रसंगी खूनसुद्धा घडतात. हे कधी थांबणार?

“बाहुबली’ चित्रपटातील साखळदंडात बांधून ठेवलेली देवसेना सर्वांनीच पाहिली. अत्याचारी राजा भल्लालदेव हा लग्नासाठी तिला आग्रह करत असतो. परंतु ती नकार देत असल्याने वर्षानुवर्षे तिच्यावर अत्याचार सुरू असतात. अशीच काहीशी घटना राजस्थानमध्ये अलीकडेच घडली. चारित्र्याच्या संशयावरून पीडित महिलेस तीन महिन्यांपर्यंत लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार प्रतापगडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणात महिलेला कुटुंबाकडून मारहाणही केली जात होती. माध्यमांमुळे ही घटना उजेडात आली. आईचा सांभाळ करण्यासाठी माहेरी जाण्याने पतीचा तिच्यावरील संशय बळावला.

गेल्या काही वर्षांपासून नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्‍यक असणारी विश्‍वासाची वीट आता जीर्ण होत चालली आहे. आयुष्यभरासाठी जोडलेल्या नात्यांत पतीच्या मनात निर्माण होणारे गैरसमज किंवा बळावणारा संशय या कारणाने महिलांचे जीणे कठीण होऊ लागते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातही घडली. धार गावात राहणाऱ्या दोन मुली कुटुंबीयांना न सांगता नातेवाईकाकडे गेल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. लाठ्या काठ्याचा वापर केला. या मुलींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

एवढेच नाही तर मारहाणीमागे मुली सतत फोनवर बोलत असल्याचेही कारण सांगितले जात आहे. मुलीवर संशय व्यक्‍त करणे किंवा त्यांना मारहाण करणे ही बाब तकलादू नातेसंबंधाची साक्ष देते. गैरसमजातून आईवडिलांचा विचार हा किती खालच्या पातळीवर पोचतो, हे देखील सिद्ध झाले. एकदा का संशयाचे भूत मानगुटीवर बसले की, मारहाण, खून, ऍसिड हल्ला एवढेच नाही तर ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात. अर्थात या घटना आपल्याला सतत ऐकावयास आणि वाचावयास मिळतात. दुर्दैवाने करोनाच्या काळातही संशयी स्वभावामुळे केवळ अशिक्षित घरातच नाही तर उच्च शिक्षित घरातही महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. एखाद्या महिलेवर संशय निर्माण झाल्यास गावातील पंचायतीने देखील तिला शिक्षा दिल्याचे प्रकार घडले आहेत.

महानगरापासून ते ग्रामीण भागापर्यंत पसरलेल्या संशयी विचारसरणीने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना विकसित झाली. परिणामी तिला कधी शाळा, नोकरी तर कधी कधी घरापर्यंत सोडण्यात येते. कमी वयातील युवती, प्रत्येक वयोगटातील महिला या संशयाच्या बेड्यात अडकल्या आहेत. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि विश्‍वासाच्या भावना या सर्वाधिक कुटुंब आणि घराशी जोडलेल्या असतात. परंतु सभोवतालच्या घटना पाहता कुटुंब, जोडीदार आणि समाज यांची महिलांप्रती असलेली घृणास्पद विचारसरणी प्रकर्षाने जाणवते. सतत घडणाऱ्या घटनांमुळे तडजोड, आपापसातील समझोता या पातळ्यांवर महिलांनाच अधिक झुकते माप घ्यावे लागते. वास्तविक बदलाच्या नावावर समाजात कोणतेच बदल झालेले दिसून येत नाहीत. बुरसटलेल्या मानसिकतेचा परिपाक म्हणजे प्रतापगडमधील महिलेला मारहाण करण्यात तिचा मुलगा देखील सामील होता.

गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता सर्वाधिक प्रकरणे हे अनैतिक संबंधावरून व्यक्‍त होणाऱ्या संशयाची आहेत. हॉटस्टॉरच्या आउट ऑफ लव्ह सर्वेक्षणानुसार विवाहित जोडप्यांच्या मनात असुरक्षितता कमालीची वाढली आहे. या सर्वेक्षणानुसार 45 टक्‍के भारतीय हे गुप्त मार्गाने आपल्या जोडीदाराचा फोन तपासण्याची इच्छा बाळगून असतात तर 55 टक्‍के लोकांनी हे काम अगोदरच केलेले आहे. बुसरटलेल्या विचारसरणीला तंत्रज्ञानाने आणखीच बळ दिले आहे. गेल्यावर्षी राजस्थानमध्ये पतीने पत्नीचा संशयावरून खून केला. या घटनेच्या तपासातून एक बाब निदर्शनास आली, की मृत पत्नी सोशल मीडियावर खूपच सक्रिय होती आणि फेसबुकवर तिचे सुमारे 6 हजार फॉलोअर्स होते. व्हर्च्युअल जगातील तिची सक्रियता जीवावर बेतली. पत्नीवर संशय येऊ लागला आणि त्याने तिचा खून केला.

संशयी विचारसरणीबरोबरच अहंकारी स्वभावाचा परिणाम म्हणजे कोणत्याही महिलेस डायन समजून तिचा जीव घेतला जातो. जुन्या विचारसरणीच्या समाजापासून ते आधुनिक विचारात राहणाऱ्या समाजापर्यंत महिलांच्या अडचणी कमी न होता वाढत चालल्या आहेत.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, गेल्या एक दीड वर्षात करोना संकटाने “एक दुजे’चे धडे शिकवले आहेत. परंतु एका महिलेस आईचा सांभाळ करण्याचा विचारदेखील किती महागात पडू शकतो, हे राजस्थानच्या घटनेवरून कळते. मुलींनी फोनवर बोलणे देखील मार खाण्यास कारणीभूत ठरत आहे. या सर्व घटनांमागे प्रमुख कारण म्हणजे संशयात अडकलेली विचारसरणी. त्याच्यावर एकमेव उपचार म्हणजे पुरुषप्रधान विचारात बदल करणे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.