विदेशरंग : सौदीच्या भारतासाठी पायघड्या

-आरिफ शेख

पाकचा आश्रयदाता असलेला सौदी अरेबिया मागील काही वर्षांपासून भारताच्या निकट येत आहे. उभय देशांत 2014 ला लष्करी सहकार्य कराराबाबत “मेमोरेंडम ऑफ अंडर स्टॅंडिंग’ झाले होते. आता संयुक्‍त युद्ध सराव होणार आहे. सौदीने पाकला आपल्या तंबूतून बाहेरचा रस्ता तर दाखविलाच, शिवाय भारतासाठी पायघड्या अंथरल्या आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी भारतीय लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी सौदी अरेबियाचा सरकारी दौरा केला होता. त्याची दखल जगभरातील प्रमुख माध्यमांनी घेतली. पाक मीडियाने सरकारचे कान उपटले. या भेटीचा सर्व तपशील बाहेर आलेला नाही. परंतु उभय देशांत लवकरच संयुक्‍त युद्धसराव होणार असल्याचे नुकतेच जाहीर झाल्याने त्याची सर्वदूर चर्चा होताना दिसते. दोन देशांदरम्यान युद्धसराव तशी नवी बाब नाही. मात्र, जेथे सौदी भूमीवर भारतीय सैन्याला आजवर पाय ठेवण्याची संधी मिळाली नाही, तेथे थेट युद्ध अभ्यासाची संधी मिळणे ही असाधारण घटना म्हणावी लागेल. यावर पाक माध्यमांनी जो कांगावा केला त्याला विविध कंगोरे आहेत. सौदी-पाकदरम्यान अनेकदा युद्धसराव झाले आहेत. तेथील पवित्र धार्मिक स्थळांचे संरक्षण पाक सैन्याकडे आहे. पाक सैन्य अधिकारी सौदी अरेबियाच्या लष्कराला प्रशिक्षण देत असतात. धार्मिक व आर्थिक बाबतीत पाक हा सौदी अरेबियाचा आश्रित आहे. काश्‍मीरप्रश्‍नी आजवर तो पाकच्या सुरात सूर मिसळत असे. अजून मागे गेल्यास 1965 व 1971च्या भारत-पाक युद्धात सौदीने पाकची उघड बाजू घेतली होती.

वरील पार्श्‍वभूमी विचारात घेतली तर सौदीने पाकला आपल्या तंबूतून बाहेरचा रस्ता दाखविणे व भारताशी सौहार्द वाढविणे या सामान्य घटना म्हणता येणार नाहीत. एक प्रकारे ही पाकिस्तानची मोठी पीछेहाट तर आहेच, शिवाय भारताचे मुत्सद्देगिरीच्या पातळीवर मोठे यश देखील आहे. पाक हा आपला विश्‍वासार्ह सोबती नसल्याचे सौदीच्या केव्हाच लक्षात आले होते. कलम 370 प्रश्‍नी पाकच्या भूमिकेला सौदी अरेबियाने थंड प्रतिसाद दिला. शिवाय तुर्की, मलेशिया, कतार, इराण यांच्या नादी लागून सौदीच्या नेतृत्वाला आव्हान देत इस्लामी राष्ट्रांची पर्यायी संघटना उभारण्याचे प्रयत्न पाकने केले होते. पाक परराष्ट्रमंत्र्यांनी सौदीवर केलेली टीका, त्यानंतर पाकचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांनी वातावरण निवळण्यासाठी केलेला सौदीचा दौरा, त्यांना राजघराण्याने भेटण्यास दिलेला नकार, पाककडून तीन अब्ज डॉलरची येणे बाकी तत्काळ देण्याचे सौदीचे फर्मान पाहता दोन्ही देशांत कटुता दिवसागणिक वाढत गेली. त्याच दरम्यान अमेरिकेत ज्यो बायडेन सत्तेत आले. सौदी राजघराण्याला हा मोठा धक्‍का होता.

बायडेन यांचे सौदी राजघराण्याबाबत पूर्वीपासून प्रतिकूल मत आहे. मानवी हक्‍कांच्या पायमल्लीचा मुद्दा असो, की सौदीला एकाकी पाडण्याचे विधान असो, येमेन युद्धाचे समर्थन मागे घेण्याचा विषय असो, हुती बंडखोरांना अतिरेकी ठरविण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला मागे घेणे असो, सौदी सरकारवर टीकाप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या पत्रकारांना मुक्‍त करण्याचे आवाहन असो, प्रत्येक बाबतीत बायडेन यांचे सौदीबाबत पूर्वग्रह आहेत. मध्य पूर्वेतील अशांततेत सौदीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असल्याचे सांगत सौदी हा “प्रॉब्लेम क्रिएटर’ असल्याचे त्यांनी 2014 ला केलेले विधान अजून विस्मरणात गेलेले नाही. बायडेन यांच्या सत्तेत येण्याने सौदी अरेबिया धास्तावणे स्वाभाविक आहे. त्याला विश्‍वासार्ह सोबती हवा होता. भारत त्याला यासाठी पात्र वाटला असावा. दोन्ही देशांतील जवळीक वरील बदलत्या पार्श्‍वभूमीवर वाढत गेली.

2014 पासून सौदी-भारत दरम्यान या बदलास प्रारंभ झाला. अलीकडे तो अधिक गतिमान झाला. 2015 ला भारतीय लढाऊ विमान पहिल्यांदा सौदी भूमीवर ताईफ येथे लॅंड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी सरकारने सन्मानित केले. 2014 ला झालेल्या संरक्षण सहकार्य करारानंतर भारतीय नौदलास सौदीच्या समुद्री हद्दीत मुक्‍त प्रवेश मिळू लागला. उभय देशांत संयुक्‍त युद्धसराव होणार होता, कोविडमुळे तो लांबला. आता युद्ध सराव होत असल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकने अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही, परंतु पाकच्या माध्यमांनी यावरून मोठे काहूर उठविले आहे. धार्मिक भूमीवर भारतीय सैन्याचे पाऊल कसे काय? पाक सरकार गप्प कसे? इम्रान खान यांनी झोपेचे सोंग घेतले की काय? आपण अगतिक अन्‌ हतबल झालोय, पाकचा आश्रयदाता का दुरावला? तुर्कीच्या नादी लागून आम्ही सौदीचा तंबू गमावला, आदी असंख्य प्रश्‍नांची सरबत्ती पाक माध्यमांनी सरकारवर केली आहे.
भारताशी युद्धसराव इतपत उभय देशांतील संबंध थांबतील, असे दिसत नाही.

सौदीच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय सैन्य तैनात केले गेले तर आश्‍चर्य वाटायला नको. त्यात राजघराण्याची सुरक्षा महत्त्वाचा भाग आहे. सौदी राज्यकर्त्यांना देशापेक्षा स्वतःची अधिक काळजी असते. पाक सैन्य आजवर सौदी राजघराण्याची सुरक्षा करीत असे, त्यांची जागा भारताने घेतली तर नवल वाटायला नको. सौदी भूमीवर भारताला सैन्यतळ उभारण्याची संधी या निमित्ताने समोर येऊ शकते. ती ऐतिहासिक घटना असेल. जनरल नरवणे यांच्या सौदी दौऱ्यात त्यांचे झालेले जंगी स्वागत, उभय देशांत होणारा युद्धसराव, अन्‌ पाकला दाखविला गेलेला बाहेरचा रस्ता पाहता पाकचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. सौदी-भारत संबंध रोखण्याची शक्‍ती पाकने केव्हाच गमावली आहे. तुर्कीच्या नादी लागून इम्रान खान यांनी सौदीशी अंतर वाढविले, भारताने मोठ्या मुत्सद्देगिरीने ही पोकळी भरून काढली. याबाबत पाकवर अरण्यरुदनाची वेळ भारताने आणली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.