अमृतकण | जे जे भेटे भूत…

– अरुण गोखले

संत एकनाथ महाराज हे त्यांच्या कथा निरुपणातून, कीर्तन प्रवचनातून, लेखनातून लोकांना मानवतेची, भूतदयेची, सर्वांशी प्रेमाने, आदराने आणि प्रियत्वाने वागण्याची शिकवण देत. जे जे भेटे भूत तेचि जाणावे भगवंत, असा बोध करीत.

एकदा महाराज आपल्या काही सोबतच्या लोकांबरोबर काशीयात्रेला गेले. त्यावेळी त्यांच्या मनात असा एक विचार आला की, आपण काशीच्या गंगेचे पवित्र पाणी घेऊन ते दक्षिणेतल्या श्री रामेश्‍वराला घालावे. त्या रूपाने शिव-रामाची भेट घडवावी. त्यांनी तसा विचार, तसा संकल्प केला आणि यात्रेवरून परत येत असताना त्यांनी खांद्यावरून घागरभर गंगेचे पाणी बरोबर आणले.

त्यांचा परतीचा प्रवास फार दूरचा होता. उन्हाळ्याचे दिवस होते. एका उजाड आणि रखरखीत अशा प्रदेशातून चालत जात असताना त्यांना एक गाढव गरम मातीच्या फोफाट्यात पडलेले दिसले. त्यांच्या बरोबरीचे लोक गाढवाला पाहूनही पुढे गेले.

परंतु एकनाथ मात्र त्या गाढवाजवळ गेले. त्यांनी तो तहानेने व्याकूळ झालेला जीव पाहिला. त्याची पाण्यावाचून कोरडी पडलेली जीभ, कंठाशी आलेला प्राण पाहिला आणि एकनाथांच्या मनात भूतदया जागी झाली. त्यांचे मन कळवळले. त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी जे काशीचे गंगोदक रामेश्‍वरास घालण्यासाठी घेतले होते ते आपल्या जवळचे गंगेचे पवित्र पाणी त्या गाढवाला पाजले.

एकनाथांबरोबरचे सर्व लोक त्यांना नावे ठेवू लागली. ते म्हणाले, “”महाराज, अहो तुम्ही हे काय केलेत? गंगेचे पवित्र पाणी तेही त्या रामेश्‍वराला नेऊन घालण्यासाठी तुम्ही इतक्‍या दुरून आणलेले. ते पाणी तुम्ही त्या गाढवाला पाजलेत. काय म्हणायचे तुम्हाला? छे! काय केलेत हे तुम्ही? तुम्ही ते गंगेचे पवित्र पाणी त्या गाढवाला पाजून असे फुकट वाया का घालवले.”

त्यावर संत एकनाथ म्हणाले, “”अरे बाबांनो, तो परमेश्‍वर सर्व प्राण्यांमध्ये आहे असे आपण म्हणतो, बोलतो, सांगतो, होय ना? मग मी काय चूक केली. मला त्या तहानलेल्या गाढवातही देवच दिसला. म्हणून मी त्याला भूतदयेने पाणी पाजले. “जे जे भेटे भूत तेचि मानिजे भगवंत’ ही शिकवण मी फक्‍त आचरणात आणली इतकंच. यात माझं काही चुकलं का?”

लोक काय बोलणार. बोले तैसा चाले या वचनोक्‍तीप्रमाणे लोकांनी नाथांचेच पाय धरले. संत एकनाथांच्या भूतदयेचे हे एक श्रेष्ठ उदाहरण. संत एकनाथांनी भूतदयेचा संदेश प्रत्यक्ष कृती करून दाखविला. त्यांचा संदेश आज आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.