विविधा | रमेश मंत्री

– माधव विद्वांस

खुसखुशीत विनोदीशैलीने वाचकांना हसविणारे विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून वाचकांमध्ये आपले वेगळेच स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे मूळ नाव रमेश शंकर कुळकर. 

त्यांचा जन्म कोकणात, कुडाळजवळच्या झाराप या गावी 6 जानेवारी, 1925 रोजी झाला. ते राजाराम मंत्री यांना दत्तक गेल्यानंतर त्यांचे नाव रमेश राजाराम मंत्री झाले. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. एम.ए. करीत असतानाच त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला व कोल्हापूरच्या एका दैनिकात सहसंपादक झाले. नंतर वृत्तपत्र व्यवसायाचे अत्याधुनिक शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.

वर्ष 1958 मध्ये अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी म्हणून हजर झाले. सुमारे 20 वर्षे ते अमेरिकेतच राहिले. त्या काळात त्यांनी देश-विदेशांत भरपूर प्रवास केला. त्या प्रवासातील अनुभवांतून त्यांनी प्रवासवर्णने लिहिली. त्यांनी अल्पावधीत भरपूर लिखाण केले. वर्ष 1979 मध्ये 34 पुस्तके लिहिण्याचा त्यांनी विक्रम केला. यावरून त्यांच्या लिखाणाच्या जलद गतीची कल्पना येते.

त्यांच्या मित्रमंडळात अनंत काणेकर, गजानन जहागीरदार, सी. रामचंद्र, ग. वा. बेहरे, श्री. ज. जोशी, वसंत सरवटे, बाळ गाडगीळ, उमाकांत ठोंबरे अशी साहित्य व कला क्षेत्रांतील मंडळी होती. रमेश मंत्री यांनी सुमारे 130 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यातली बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. “थंडीचे दिवस’, “सुखाचे दिवस’, “नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. त्यांची प्रवासवर्णने वाचताना वाचक त्या जागेवर जाऊन पोहोचतो व आपल्या मनःचक्षूने त्या ठिकाणाची अनुभूती घेतो, इतके खुमासदार वर्णन त्यांनी केले.
सामान्य रसिक वाचक डोळ्यांसमोर ठेवूनच हलक्‍याफुलक्‍या विनोदाचे लेखन त्यांनी केले. त्यांचा विनोद बोचरा नव्हता, तर गालावर हसू उमटविणारा होता. त्यांचे जीवन शिस्तबद्ध होते. दररोज सकाळी 3-4 तास ते एकाग्रतेने लेखन करीत. प्रत्यक्षात नसलेली अशी काल्पनिक परिस्थितीवरील लेखनाची “विनोदी फॅन्टसी’ हा नवा साहित्यप्रकार त्यांनी मराठी वाङ्‌मयात आणला. त्यातूनच जेम्स बॉंडच्या धर्तीवर “जनू बांडे’ ही विडंबनात्मक व्यक्‍तिरेखा त्यांनी आपल्या लेखणीतून उभी केली.

“सह्याद्रीची चोरी’, “सचिवालयात हत्ती’, “ओठ सलामत तो’, “थट्टा मस्करी’, “चोरांचा सौजन्य सप्ताह’ यांसारखी विनोद निर्माण करणारी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. व्यक्‍तिचित्रणात्मक प्रकारात “मुलखावेगळी माणसं’, “अशी असतात एकेक माणसं’, “तुमच्या पायी ठेविले मन’ ही पुस्तके लिहिली. मुंबई मराठी साहित्य संघात साहित्यिक गप्पा, हा अतिशय अभिनव कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नातूनच सुरू झाला.

1992 सालच्या कोल्हापूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्या वेळी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरविण्याचा संकल्प अध्यक्ष या नात्याने जाहीर केला. त्यांच्या अध्यक्षीय कालखंडात अनेक नामवंत लेखकांचे भाषणांचे 95 कार्यक्रम त्यांनी वर्षभरात घडवून आणले. 19 जून 1997 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.