अबाऊट टर्न : सिक्रेट-मिशन

-हिमांशू

आपल्या देशात अनेकांना वेगवेगळ्या कॅटेगरीची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. वास्तविक, अवतीभोवती कमांडो आहेत म्हणूनच अनेकजण काहीबाही बोलत राहतात. त्यांचं बोलणं वृत्तवाहिन्यांवर लगेच दाखवलं जातं. अशा व्यक्‍तींनी केलेला एकेक ट्‌विट लाखमोलाचा ठरतो.

“नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता’ अशी जाहिरात खुद्द माध्यमं करतात… आणि मग खरोखर वादाला तोंड फुटतं. मुद्द्याचा प्रश्‍न असा, की या मंडळींच्या अवतीभोवती कमांडो नसते, तर यातल्या कितीजणांनी आपली भूमिका इतक्‍या भडकपणे मांडली असती? आधी सुरक्षा व्यवस्था घेऊन नंतर भडक बोलणारे जसे आहेत, तसेच आधीच काहीतरी बोलणारे आणि त्यावरून वाद पेटला म्हणून सुरक्षा व्यवस्था मागणारेही बरेचजण आहेत.

या सर्वांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यास सर्वत्र शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राहील, असं आम्हाला सुचवायचं नाहीये. ज्याला सुरक्षा मिळतीय त्याला बोलू दे किंवा जो बोलतोय त्याला सुरक्षा मिळू दे! आमची काहीही हरकत नाही.

भले आमच्या रक्षणासाठी कुणी शिल्लक राहो न राहो! तरी एक बरं आहे, आपल्याला कुणाच्या सुरक्षिततेसाठी नेमलंय हे पोलिसांना ठाऊक असतं. परंतु एखाद्या वेळी एखादं “सिक्रेट मिशन’ फत्ते करायचं असतं आणि काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, एवढंच पोलिसांना सांगितलं जातं. हे सगळं कशासाठी आणि कुणासाठी चाललंय, हे त्यांनाही सांगितलं जात नाही म्हणे!

आता हेच पाहा ना, हरियाणातल्या रोहतक तुरुंगाजवळ एके दिवशी सकाळी पोलीस जवानांच्या तीन तुकड्या तयार करण्यात आल्या. एका तुकडीत 80 ते 100 जवानांचा समावेश होता. पोलिसांची एक गाडी तुरुंगातून बाहेर आली. या गाडीला पडदे लावलेले असल्यामुळे आत कोण आहे, हे दिसत नव्हतं. या गाडीच्या मागे-पुढे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जे पोलीस बसले होते, त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नव्हती.

गाड्यांचा हा ताफा गुरूग्रामला आला. तिथल्या एका रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये गाडी उभी केल्यानंतर संबंधित कैदी रुग्णालयात गेला. या कैद्याला कोणताही आजार झालेला नव्हता. त्या रुग्णालयात कैद्याची आई ऍडमिट होती. आईला भेटण्यासाठी संबंधित कैद्याला एका दिवसाची “पॅरोल रजा’ मंजूर करण्यात आली होती. परंतु तेही अगदी मोजक्‍याच लोकांना ठाऊक होतं.

आईच्या तब्येतीची विचारपूस करून संध्याकाळी संबंधित कैदी पुन्हा पडदे लावलेल्या गाडीत बसला आणि शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा तुरुंगात पोहोचला. जवळजवळ पंधरा दिवसांनी या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली आणि मगच हा तपशील कैद्याच्या नावासह लोकांना समजला. हो, पोलिसांनाही तेव्हाच समजला. ज्याच्या बंदोबस्तासाठी आपली नियुक्‍ती झाली होती, त्या कैद्याचं नाव पंधरा दिवसांनी त्यांना कळलं.

हा कैदी दुसरा-तिसरा कुणी नसून “डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख राम-रहीम होता. पत्रकार रामचंद्र यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे तो रोहतक तुरुंगात जन्मठेप भोगत आहे. 2002 मधल्या या घटनेचं आरोपपत्र 2007 मध्ये दाखल झालं होतं. तत्पूर्वी दोन महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी 2017 मध्ये त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. स्वतःच्याच चमत्कारांवर स्वतःच चित्रपट काढून स्वतःच प्रमुख भूमिका करणाऱ्या राम-रहीमचे कारनामे या सिक्रेट-मिशनमुळे पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.