विविधा : शिवाजीराव भोसले

-माधव विद्वांस

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव भागातील कलेढोण येथे 15 जुलै 1927 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसऱ्या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा तर पुढील शिक्षण सातारा, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये झाले. पुण्याच्या विधी महाविद्यालयात त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. फलटण ही त्यांची कर्मभूमी, निवृत्तीपर्यंत ते मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य होते. येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास 1957 मध्ये त्यांनी प्रारंभ केला. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे 25 वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. 1988-91 या काळात त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले.

त्यांच्या फलटण येथील कार्यालयीन जबाबदारीत व्यत्यय न आणता ते महाराष्ट्रभर आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत. अनेक ठिकाणच्या वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी व्याख्यानमाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला येथे त्यांची सतत व्याख्याने होत असत.

कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक समितीच्या वतीने शिवाजीराव यांनी देशभर व्याख्यानमालांचे आयोजन केले होते. अत्यंत खुमासदार विनोदी शैलीतील त्यांच्या व्याख्यानाची प्रवेशिका मिळविण्यासाठी लोक तासन्‌तास रांगेत उभे राहात असत. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत आणि राजकारणापासून साहित्यापर्यंत सर्व क्षेत्रांतील अनोखी, कर्तृत्वसंपन्न व्यक्‍तींची चरित्रे त्यांनी श्रोत्यांना आपल्या अमोघ वक्‍तृत्वाच्या बळावर अवघ्या महाराष्ट्राला तीस वर्षे ऐकविली.

पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी सलग तीस वर्षे पहिले पुष्प गुंफले. विवेकानंद जन्मशताब्दीनिमित्ताने सरांनी जी व्याख्याने दिली त्यातून एक श्रोता, एक रुपया याप्रमाणे 70 ते 80 लाख रुपये कन्याकुमारीच्या शिला स्मारकासाठी प्राचार्यांनी मिळवून दिले. महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने देत असतानाच प्रा. भोसले यांनी दीपस्तंभ, मुक्‍तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्‍न अशी ग्रंथरचना केली.

पुणे येथील “प्राचार्य शिवाजीराव भोसले’ स्मृती समिती दरवर्षी 15 जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार प्रदान करते. आतापर्यंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (2012), शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (2013), साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार (2014), सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (2015), डॉ. ह. वि. सरदेसाई (2016), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (2017), माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (2018) अशा कर्तृत्ववान व्यक्‍तींना पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.