70 वर्षांपूर्वी प्रभात : शनिवार ता. 8 माहे ऑगस्ट सन 1953

शेख अब्दुलांचे मनांत सध्या “स्वतंत्र काश्‍मीर’ योजना आहे 

नवी दिल्ली ता. 7: “स्वतंत्र काश्‍मीर’चा प्रश्‍न काश्‍मीरमध्ये चर्चिला जात आहे आणि शेख अब्दुल्ला ह्यांनीं निरनिराळ्या स्वरूपांत त्याबाबत चर्चा केली आहें; परंतु एका विशिष्ट स्वरूपाची निश्‍चित सूचना म्हणून तो प्रश्‍न परिषदेपुढें आलेला नाहीं असें जम्मू-काश्‍मीर राष्ट्रीय परिषदेचे सरचिटणीस मौलाना महमद सयीद मसूदी ह्यांनीं आज येथें सांगितलें.

संलग्नीकरणाचा करार, राज्यघटनेचे 370 कलम, आणि दिल्ली करार ह्यानुसार भारत व काश्‍मीरमध्यें जे परस्पर संबंध प्रस्थापित झाले आहेत त्याशीं परिषद बांधलीं गेलीं आहें असेंही त्यांनीं सांगितलें.

वृत्तपत्रांना सल्ला…

भारतांतील वृत्तपत्रें आणि भारतीय जनता ह्यांनी थोडा धीर धरला तर सर्व शंका-कुशंका आणि गैरसमज लवकरच दूर होतींल असेहीं ते म्हणाले.

संपूर्ण विलीनीकरण नाहींच..

ज्या तीन बाबींपुरते काश्‍मीर भारतांत विलीन झालें आहें त्या बाबींपेक्षा एकाही अधिक बाबतींत काश्‍मीर आपलें सार्वभौमत्व सोडण्यास तयार नाहीं आणि भारतांत संपूर्ण विलीनीकरणांस काश्‍मीरची प्रजा आणि राष्ट्रीय परिषद तयार होणार नाहीं असेहीं त्यांनीं जाहीर केले. संपूर्ण विलीनीकरणाच्या जनसंघ आदि पक्षांच्या मागणींतूनच प्रतिक्रिया म्हणून “स्वतंत्र काश्‍मीर’ कल्पनेचा उदय झाला आहें असेहीं ते म्हणाले. 

 

रेडियो श्रवणाचा शाळेच्या अभ्यासांत समावेश करा

कलकत्ता, ता. 7 : विद्यार्थ्यांची सांस्कृतिक व शैक्षणिक वाढ होण्याच्या दृष्टीनें रेडियोच्या शालेय-कार्यक्रमाचे महत्त्व लक्षांत घेऊन अभ्यासक्रमांतच रेडियो श्रवणाचा समावेश करा असा केंद्राच्या शिक्षण खात्यानें राज्य सरकारना आदेश दिला आहें असें कळते.

रेडियोवरून प्रादेशिक वृत्त- निवेदन : दोन केंद्रांवर प्रयोगादाखल सुरुवात

नवी दिल्ली,आकाशवाणीच्या दोन केंद्रांवरून फक्‍त प्रादेशिक वृत्ते देणारी प्रादेशिक वृत्तनिवेदने करण्याचा प्रयोग करून पाहण्यांत येत आहे. सध्या ती लखनौ व नागपूर केंद्रावरून प्रक्षेपित होतात. या दोन केंद्रांवर येणाऱ्या अनुभवावरून इतर केंद्रांचे बाबतींत ही योजना सुरू करण्याच्या प्रश्‍नाचा विचार करण्यांत येईल, असें भारताच्या माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉ. केसकर यांनी प्रश्‍नोत्तराचे वेळीं लोकसभेत सांगितलें.

Leave A Reply

Your email address will not be published.